विनेश फोगटचे पुनरागमन थांबले, भारतीय कुस्ती महासंघाने स्टार खेळाडूला 'कारणे-दाखवा' नोटीस बजावली; 26 जूनपर्यंत अपात्र…

भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) शनिवारी (९ मे) कुस्तीपटू विनेश फोगाटला गैरशिस्त आणि उत्तेजक द्रव्य विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच पुनरागमन करण्यासाठी अनिर्वाय सहा महिन्यांची पूर्वसूचना न दिल्याने तिच्यावर २६ जून २०२६ पर्यंत देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेण्यास मनाई केली आहे.

फेडरेशनने विनेशला नोटीस बजावली असून तिच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. तिने सेवानिवृत्तीतून परत येण्यासाठी अनिर्वाय सहा महिन्यांची पूर्वसूचना दिली नाही. यामुळे तिने डब्ल्यूएफआय, यूडब्ल्यूडब्ल्यू कुस्ती नियम आणि उत्तेजक द्रव्ये विरोधी नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यासाठी तिला १५ पानांची नोटीस बजावली आहे. वाडाच्या नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे, ते तिने केले नाही.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या विनेशला चार आरोपांवर स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामध्ये वजन न जुळल्याने २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवणे, उत्तेजक द्रव्य विरोधी नियमांनुसार ठिकाणाबद्दल माहिती देण्यात अपयशी आणि तत्कालीन आयओए नियुक्त पॅनेलने आयोजित केलेल्या मार्च २०२४ च्या निवड चाचण्यांदरम्यान दोन वजन गटांमध्ये स्पर्धा करणे यांचा समावेश आहे.

विनेशने २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यापासून अपात्र ठरल्यानंतर तिने कुस्तीतून निवृत्ती घेतली होती. आता ती रविवार ते मंगळवार (१० ते १२ मे) दरम्यान गोंडा, उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय खुल्या मानांकन स्पर्धेत पुनरागमन करण्याच्या तयारीत होती.

भारतीय महासंघाचे अध्यक्ष संजय सिंग म्हणाले, “वाडाच्या नियमांचे पालन झाले आहे की नाही हे आम्हाला पाहावे लागेल. निवृत्तीतून परत येण्यासाठी तिने अनिर्वाय अटी पूर्ण केल्या आहेत, हे सिद्ध झालेले नाही. यामुळे तिला पुन्हा खेळण्याआधी सहा महिन्यांचा अनिर्वाय नोटीस कालावधी पूर्ण करावा लागेल.”

विनेशला नोटीसला प्रतिसाद देण्यासाठी १४ दिवसांची मुदत दिली आहे.

Comments are closed.