भावनिक ब्रेकनंतर मोठा निर्णय; विनेश फोगाट परतणार कुस्तीच्या रणांगणात, म्हणाली, आता लक्ष्य…
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट हिने आपल्या निवृत्तीच्या निर्णयावर मोठा यू-टर्न घेत पुनरागमनाची अधिकृत घोषणा केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान निवृत्ती जाहीर केल्यानंतर प्रथमच सोशल मीडियावर पोस्ट करत तिने आपल्या पुढील प्रवासाबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. LA 2028 ऑलिम्पिक हेच आता तिचं एकमेव लक्ष्य असल्याचं विनेशने सांगितलं आहे.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये विनेश फोगाटने ऐतिहासिक कामगिरी करत फायनलमध्ये धडक मारली होती. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. मात्र, अवघ्या 50 ग्रॅम वजन जास्त असल्याच्या कारणावरून तिला अंतिम फेरीतून बाद करण्यात आलं. या धक्कादायक निर्णयानंतर भावनिक झालेल्या विनेशने निवृत्तीची घोषणा केली होती.
निवृत्तीनंतर काही काळ शांत राहिलेल्या विनेशने आता सोशल मीडियावर मन मोकळं केलं आहे. “पॅरिस हे माझं शेवटचं ऑलिम्पिक होतं का, असा प्रश्न अनेकांनी विचारला. त्या वेळी माझ्याकडे उत्तर नव्हतं. स्वतःपासून, स्पर्धेच्या दबावापासून आणि अपेक्षांपासून दूर राहण्याची गरज होती,” असं विनेशने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे ती म्हणते, “मन तुटलं आहे, अनेक त्याग केले आहेत. शिस्त, दिनचर्या आणि संघर्ष हे माझ्या आयुष्याचा भाग आहेत. कितीही दूर गेले तरी माझा एक भाग नेहमी मॅटवरच असतो. कुस्ती हा केवळ खेळ नाही, तो माझा श्वास आहे,” अशा शब्दांत तिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
विनेश फोगाटने स्पष्ट केलं आहे की, आता ती नव्या जोमाने 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकची तयारी करणार आहे. लवकरच ती प्रशिक्षणाला सुरुवात करणार असून, या प्रवासात तिचा लहान मुलगा तिचा ‘छोटासा चीअरलीडर’ असेल, असंही तिने नमूद केलं आहे.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमधील निर्णयाविरोधात विनेशने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (CAS) मध्ये अपील केलं होतं. समिती स्थापन झाली होती, मात्र सुनावणीला उशीर झाल्याने तिचं अपील फेटाळण्यात आलं. तीन ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करूनही तिच्या गळ्यात अद्याप ऑलिम्पिक पदकाची माळ पडलेली नाही.
कुस्तीबरोबरच विनेश फोगाटने राजकारणातही यश मिळवलं आहे. हरियाणातील जुलाना मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर 6,015 मतांच्या फरकाने तिने विजय मिळवला आहे. मात्र, निवृत्तीचा निर्णय मागे घेत, आता ती पुन्हा एकदा पूर्ण आत्मविश्वासाने अखाड्यात परतण्यासाठी सज्ज झाली असून, भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणं हेच तिचं अंतिम ध्येय असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.
Comments are closed.