Vinod Kambli admitted to hospital due to deteriorating health rrp
विनोद कांबळीची अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्याला भिवंडीतील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचे रुग्णालयातील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हा चर्चेत आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच असंख्य क्रिकेटपटूंचे दिग्गज प्रशिक्षक द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाच्या अनावरण सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यानंतर त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबतच्या नात्यावर भाष्य केले होते. अशातच आता पुन्हा एकदा विनोद कांबळी हा चर्चेत आला आहे. कारण तो रुग्णालयात असल्याचे फोटो समोर आले आहे. (Vinod Kambli admitted to hospital due to deteriorating health)
मिळालेल्या माहितीनुसार, 52 वर्षीय विनोद कांबळी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. 21 डिसेंबर रोजी रात्री उशीरा अचानक त्याची तब्येत बिघडल्यामुळे त्याला भिवंडीतील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विनोद कांबळीचे रुग्णालयातील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. डॉक्टरांनी विनोद कांबळीला निरीक्षणाखाली ठेवले असून त्याच्या सर्व आवश्यक चाचण्या करत आहेत.
– Advertisement –
आकृती रुग्णालयाचे संचालक शैलेश ठाकूर हे बालपणापासून क्रिकेटचे चाहते आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी विनोद कांबळी यांचे अनेक सामने पाहिले आहेत. सोशल मीडियावर विनोद कांबळी याच्या प्रकृती अस्वस्थतेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर शैलेश ठाकूर यांनी भावनिक होत त्याला मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला. याचपार्श्वभूमीवर त्यांनी विनोद कांबळी याला रुग्णालयात दाखल करून घेतले आहे. यासंदर्भात माहिती देताना शैलेश ठाकूर म्हणाले की, विनोद कांबळी हे भारतासाठी योगदान देणारे महान खेळाडू आहेत. त्यांना मदतीची गरज असल्याचे पाहून सहकार्य करणे हे माझे कर्तव्य असल्याचे मी मानतो.
Today meet great cricketer vinod kambli sir in AKRUTI hospital pic.twitter.com/3qgF8ze7w2
— Neetesh Tripathi (@NeeteshTri63424) December 23, 2024
– Advertisement –
विनोद कांबळी याने त्याच्या चाहत्यांना आपल्याला प्रकृतीची माहिती दिली आहे. त्याने म्हटले की, माझी प्रकृती सुधारत असून मी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. तसेच तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांमुळे मला बळ मिळाले आहे, असे म्हणत विनोद कांबळी याने राज कपूर यांच्या “मेरा नाम जोकर” या चित्रपटातील गाण्याच्या काही ओळी गायल्या आहेत.
कल खेल मे हम हो नं हो
गर्दीश मे तारे रहेंगे यहाँ
भुलोगे तुम, भुलेंगे हम
पर हम तुम्हारे रहेंग सदा
रहेंग यदी अपने निशा
जिसके सिवाँ जाना कहाँ…
1983 विश्वचषक संघातील दिग्गजांकडून मदत
दरम्यान, अलीकडेच भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर यांनी विनोद कांबळीला मदतीचा हात पुढे केला होता. गावस्कर यांनी 1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या वतीने कांबळीला मदत करण्याची घोषणा केली होती. ही घोषणा करताना त्यांनी विनोद कांबळीचे आपला मुलगा असल्याचे म्हटले होते. तर दुसरीकडे विनोद कांबळीने पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतल्यास त्याच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्यास तयार असल्याचे कपिल देव यांनी म्हटले होते. यानंतर कांबळीने कपिल देव यांचा हा प्रस्ताव मान्य करून पुनर्वसन करण्यास होकार दिला होता.
Comments are closed.