मी गोळीबाराचा आदेश दिला नव्हता, नेपाळमधील Gen-Z निदर्शनांमध्ये ७२ जणांच्या मृत्यूंबद्दल माजी पंतप्रधान ओली यांचा दावा

नेपाळमध्ये Gen-Z निदर्शनांच्या पहिल्या दिवशी झालेल्या गोळीबारात १९ जणांचा मृत्यू झाला होता. या निदर्शनांदरम्यान पोलिसांकडून गोळीबार झाल्याच्या आरोपांवर माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. “मी गोळीबाराचा आदेश दिला नव्हता, याची चौकशी करा,” असे ते म्हणाले आहेत. तसेच माझ्या कार्यकाळात पोलिसांकडे ऑटोमॅटिक शस्त्रास्त्रे नव्हती, असा दावाही त्यांनी केला आहे.
के.पी. शर्मा ओली म्हणाले आहेत की, “सरकारने आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले नव्हते. आंदोलकांवर ऑटोमॅटिक बंदुकांनी गोळीबार करण्यात आला, ज्या पोलिसांकडे नव्हत्या आणि याची चौकशी झाली पाहिजे.” ते म्हणाले, यात घुसखोरांनी कट रचून आंदोलनाला हिंसक वळण दिले. त्यामुळे आमचे तरुण मारले गेले.”
दरम्यान, ८ सप्टेंबर २०२५ रोजी नेपाळमध्ये Gen-Z तरुणांनी सुरू केलेल्या निदर्शनांनी हिंसक वळण घेतले. या दिवशी पोलीस आणि निदर्शकांमध्ये झालेल्या चकमकींमुळे १९ जणांचा गोळीबारात मृत्यू झाला. एकूणच या निदर्शनांमध्ये ७२ जणांचा बळी गेला, ज्यात भातभाटेनी सुपरमार्केटमध्ये आग लागल्याने मृत्यू पावलेल्या नागरिकांचाही समावेश आहे. निदर्शनकारांनी सिंह दरबार (प्रशासकीय मुख्यालय), संसद भवन, सर्वोच्च न्यायालय, इतर न्यायालय परिसर, व्यावसायिक संस्था आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर हल्ले केले. याशिवाय, माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा, पुष्पकमल दाहाल (प्रचंड) आणि झलनाथ खनाल यांच्या घरीही आग लावण्यात आली. विशेषतः ओली यांचे बालकोट, भक्तपूर येथील घरही जाळण्यात आले.
Comments are closed.