जयपूरच्या चोमू भागात हिंसाचार

जमावाकडून दगडफेक : 6 पोलीस जखमी

वृत्तसंस्था/ जयपूर

राजस्थानची राजधानी जयपूरच्या चौमू येथे अचानक हिंसा भडकली आहे. येथे मशिदीनजीक पडलेले दगड उचलण्यावरून दोन समुदायांदरम्यान वाद होत स्थिती बिघडली. येथे कलंदरी मशीद असून तेथील अतिक्रमणावरून दीर्घकाळापासून वाद सुरू होता. एका गटाने स्वेच्छेने अतिक्रमण हटविले, परंतु काही लोकांनी लोखंडी  सामग्री लावून पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हे अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न केला असता जमावाकडून दगडफेक सुरू झाली. या कृत्यात सामील सर्व लोकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जयपूर पश्चिमचे पोलीस उपायुक्त हनुमान प्रसाद मीणा यांनी सांगितले आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तणाव दूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु वादाने विक्राळ रुप धारण केल्याने जमावाने पोलिसांवरच दगडफेक सुरू केली. या घटनेत 6 पोलीस जखमी झाले आहेत. चौमू येथे सध्या मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून स्थिती नियंत्रणात आली आहे. पोलिसांनी दगडफेकप्रकरणी 10 समाजकंटकांना अटक केली आहे.

चौमूमध्ये भडकली हिंसा

जयपूरपासून 40 किलोमीटर अंतरावरील चौमूमध्ये बसस्थानकानजीकच्या मशिदीबाहेरील दगड हटविण्यावरून वाद झाला. यानंतर गुरुवारी रात्रीपासून चौमूमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. जयपूर पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधूराचा वापर केला. चौमूमध्ये काही काळासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण

मशिदीनजीक सुमारे 45 वर्षांपासून रस्त्याच्या कडेला मोठे दगड पडलेले होते. चौमूमध्ये वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी या दगडांना येथून हटविण्याचे काम सुरू होते. याच मुद्द्यावरुन या भागात तणावाची स्थिती निर्माण झाली. प्रशासनाने या घटनेशी निगडित समुदायाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती. परस्पर सहमतीनंतरच प्रशासनाने हे दगड हटविण्याचे काम सुरू केले होते. हे दगड हटविण्याचे काम पूर्ण झाले होते, परंतु येथे रेलिंग लावण्याचे काम सुरू होताच काही लोकांनी यावर आक्षेप घेत विरोध केला. लोकांच्या या विरोधाने नंतर हिंसेचे रुप धारण केले

Comments are closed.