गुजरातमधील साबरकांठा येथे हिंसाचार

अनेक घरांची तोडफोड, 30 वाहने जाळली; 20 जण ताब्यात

वृत्तसंस्था/ गांधीनगर

गुजरातमधील साबरकांठा येथील माजरा गावात शुक्रवारी रात्री दोन गटांमध्ये हिंसाचार झाला. या हिंसाचारात सुमारे 10 जण जखमी झाले. 30 वाहनांना आग लावण्यात आली असून अनेक घरांची तोडफोडही करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

धार्मिक कार्यक्रमातील वादावरून शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास माजरा गावात दोन गटांमध्ये दगडफेक आणि जाळपोळ झाली. सुमारे 110 ते 120 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही हिंसाचार जुन्या वैमनस्यातून झाल्याचे मानले जात आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी वातावरण तणावपूर्ण असल्याचे साबरकांठा येथील डीएसपी अतुल पटेल यांनी सांगितले.

गावात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. किरकोळ वादाचे रुपांतर दगडफेकीत आणि हिंसाचारात झाले. दंगलखोरांनी गावातील मालमत्तेचे मोठे नुकसान करताना अनेक वाहनांना आग लावली आणि अनेक घरांची तोडफोड केली. या हिंसाचारामुळे कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. हिंसाचाराची तीव्रता लक्षात घेता, जिल्हा पोलिसांनी तातडीने कारवाई करत गावात मोठा बंदोबस्त तैनात केला. पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या आणि हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 20 जणांना अटक केली आहे.

Comments are closed.