Operation Sindoor – ठार झालेल्या दहशतवाद्यांना पाक सैनिक आणि पोलिसांनी दिला खांदा

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला हिंदुस्थानने 7 मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानवर हवाई हल्ला करून घेतला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये (पीओके) कार्यरत असलेल्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले.
हिंदुस्थानने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर 24 क्षेपणास्त्रे डागून उद्ध्वस्त केले. बहावलपूर, मुरीदके, गुलपूर, भिंबर, चक आमरू, बाग, कोटली, सियालकोट आणि मुझफ्फराबाद या 9 ठिकाणी हिंदुस्थानने पाकिस्तानी तळांवर हल्ले केले आहेत.
दहशतवादी अड्डे नष्ट करण्यासाठी हिंदुस्थानने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील 10 सदस्यांचाही मृत्यू झाला. या हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबातील 10 सदस्यांसह त्याचे 4 साथीदारही मृत्युमुखी पडले. यामुळे दहशतवादी अझहरला धक्का बसला आहे.
दरम्यान, या हल्ल्यानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पाकिस्तानी सैनिक, पोलीस अधिकारी आणि अनेक मोठे नेते हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले आहेत. या व्हिडीओत पाकिस्तानी सैनिक आणि पोलीस दहशतवाद्यांच्या मृतदेहाला खांदा देताना दिसत आहेत.
Comments are closed.