मोबाईल दुरुस्तीसाठी पैसे मिळाले नाहीत, विरारमध्ये अल्पवयीन मुलीनं जीवन संपवलं

फ्लिप अल्पवयीन मुलगी केस: पालघर जिल्ह्यातील विरार (Virar) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. मोबाईलचा डिस्प्ले खराब झाल्यामुळे तो दुरुस्त करण्यासाठी घरातून पैसे न मिळाल्यानं नाराज झालेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण विरार परिसरामध्ये कमालीची हळहळ व्यक्त केली जात आहे.

Jivdani Darshan Chawl Virar East : घरातच ओढणीने घेतला गळफास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता महादेव सलगरे (वय 17) असं मृत पावलेल्या दुर्दैवी मुलीचं नाव आहे. ती आपल्या आईसोबत विरार पूर्व येथील गडगापाडा परिसरातील ‘आय जीवदानी दर्शन’ चाळीमध्ये राहत होती. रविवारी रात्री साधारण 10.45 वाजेच्या सुमारास जेव्हा घरात सर्व जण होते, तेव्हा अनिताने आपल्या राहत्या घरातील खोलीत छताला असलेल्या लोखंडी पाईपला ओढणी बांधून गळफास घेतला. हा भयानक प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तिला अत्यंत तातडीने खाली उतरवलं, मात्र तोपर्यंत तिचा जागीच मृत्यू झाला होता.

Mobile Repairing Money Issue : आर्थिक अडचणीमुळे पैसे देता आले नाहीत

विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी या घटनेबाबत माहिती दिली. प्राथमिक तपासात आणि कुटुंबीयांच्या चौकशीतून असे समोर आलं की, अनिताच्या मोबाईलचा डिस्प्ले (Mobile Display) काही दिवसांपूर्वी खराब झाला होता. ती तो दुरुस्त करण्यासाठी आईकडे सतत पैशांची मागणी करत होती.

मात्र, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं आईला तातडीने पैसे उपलब्ध करून देता आले नाहीत. याच कारणावरून गेल्या काही दिवसांपासून अनिता प्रचंड नाराज आणि मानसिक तणावात होती. याच आर्थिक विवंचनेतून आणि रागाच्या भरात तिने रविवारी रात्री हे टोकाचं आणि अत्यंत घातक पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं.

Virar Police Station ADR Registered : पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद

या प्रकरणाची माहिती मिळताच विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी या प्रकरणाची सर्व बाजूने चौकशी सुरू केली असून, सध्या विरार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची (ADR  Accidental Death Report) नोंद करण्यात आली आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, शवविच्छेदन अहवाल आणि पुढील सखोल तपासानंतर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.