विरारच्या सायंटिफिक लॅबवर आरोग्य विभागाचा छापा, अवैध स्पर्म बँकेचा भांडाफोड, नेमकं काय घडलं?
फ्लिप गुन्हे बातम्या: विरार (Virar) येथे अवैधरित्या शुक्राणू साठवणूक करून त्याचा व्यापार करणाऱ्या एजन्सीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोणतीही नोंदणीकृत वैद्यकीय शैक्षणिक पात्रता किंवा अधिकृत परवानगी नसतानाही दात्यांकडून मिळालेल्या शुक्राणूंची साठवणूक करून त्याची विक्री केली जात असल्याचे वसई-विरार महापालिकेच्या (Vasai-Virar Municipal Corporation) आरोग्य विभागाच्या पथकाच्या तपासणीत आढळून आले. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाला विरार येथील पद्मीबाई टॉवरमध्ये असलेल्या जीवदानी सायंटिफिक कंपनीमध्ये अवैधरित्या शुक्राणू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी (Manojkumar Suryavanshi) यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी (Dr. Bhakti Chaudhari) यांनी तपासणीसाठी वैद्यकीय पथकाची स्थापना करून संबंधित ठिकाणी कारवाईचे आदेश दिले.
यानुसार 9 मार्च रोजी आरोग्य विभागाच्या पथकाने पद्मीबाई टॉवरमधील जीवदानी सायंटिफिक कंपनी येथे अचानक भेट देत तपासणी केली. तपासणीदरम्यान ही कंपनी आणि संबंधित एजन्सी मयूर भागवत संखे आणि कमलेश शंकर खुत यांच्या मालकीची असल्याचे समोर आले.
Virar Crime News: अवैध व्यापार केला जात असल्याचे उघड
तपासात पुढे धक्कादायक बाब उघड झाली. संबंधित ठिकाण हे सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान अधिनियम 2021 अंतर्गत एआरटी (ART) बँक म्हणून नोंदणीकृत नसल्याचे आढळून आले. तसेच कायद्याने आवश्यक असलेली वैद्यकीय शैक्षणिक पात्रता किंवा अधिकृत परवाना नसतानाही येथे दात्यांकडून मिळालेल्या शुक्राणूंची साठवणूक करून त्याचा अवैध व्यापार केला जात असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. या प्रकाराची गंभीर दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे अवैध वैद्यकीय व्यवसायाविरोधात महापालिकेने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
Badlapur Crime News: बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणानंतर राज्य सरकार सतर्क
बदलापूरात स्त्री बीजाच्या अवैध विक्रीचं रॅकेट उघड झालं आहे. याप्रकारचं हे भीषण रॅकेट चक्क एका घरातून चालवलं जात होतं. सुलक्षणा गाडेकर या महिलेनं घरामध्ये स्त्री बीज वाढवणारी इंजेक्शन्स बेकायदेशीरपणे साठवून ठेवली होती, असा आरोप आहे. गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून हे इंजेक्शन दिलं जात होतं. त्यानंतर गर्भाशयात स्त्री बीजांची वाढ झाल्यावर संबंधित महिलांना IVF सेंटरमध्ये पाठवलं जात होतं. तिथल्या डॉक्टरांकडून ऑपरेशन थिएटरमध्ये स्त्री बीज काढून त्यांची बेकायदेशीर विक्री केली जात होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणानंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व IVF केंद्रांची संयुक्त चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकांकडून विविध शहरांतील IVF सेंटरची तपासणी करून अनियमितता आढळल्यास कठोर कारवाई केली जात आहे. पोलीस तपासात हे रॅकेट आंतरराष्ट्रीय स्त्री बीज तस्करीशी संबंधित असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यभरातील IVF केंद्रांची तपासणी सुरू झाल्याने पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.