विराट कोहली पत्नी अनुष्कासह प्रेमानंद महाराजांच्या भेटीला; निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी आश्रमात दाखल

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानंतर फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली. यानंतर विराटला त्याच्या पुढील खेळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. अशातच निवृत्ती जाहीर केल्याच्या दुसऱ्याच दिवशी विराने सपत्नीक प्रसिद्ध राधा कुंज आश्रमात जाऊन प्रेमानंद महाराजांचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. विराट आणि पत्नी अनुष्का बराच वेळ आश्रमात राहिले आणि प्रेमानंद महाराजांशी सुमारे 15 ते 20 मिनिटे खासगी चर्चाही केली.

विराट आणि अनुष्काचे प्रेमानंद महाराजांच्या भेटीदरम्यानचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विराट कोहली हा मुळातच धार्मिक स्वभावाचा आहे. त्याने याआधीही आपल्या पत्नी मुलांसह धार्मिक स्थळांना भेट दिल्या आहेत. यापूर्वीही कोहलीने प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाला भेट दिली होती. महाराजांचा आशीर्वाद घेतल्यानंतर कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार फलंदाजी करून हिंदुस्थानला चॅम्पियन ट्रॉफिचा मानकरी बनवले होते.

कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले होते. आता पुन्हा एकदा कोहली पत्नी अनुष्कासोबत प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचला. यावेळी विराट आणि प्रेमानंद महाराज यांच्यात बराच वेळ संवाद झाला.

प्रेमानंद महाराजांशी झालेल्या संभाषणात महाराजांनी विचारले, तुम्ही सर्वजण आनंदी आहात का? यावर विराटने हो गुरुजी असे उत्तर दिले. महाराज म्हणाले- मी तुम्हाला माझ्या गुरुंची एक कथा सांगतो. देवाची कृपा कीर्ती किंवा वैभव वाढल्यामुळे होते असे मानले जात नाही, देवाची कृपा तेव्हाच मानली जाते जेव्हा आतून चिंतन होते. संत फक्त मार्ग दाखवू शकतात. देवाच्या नावाचा जास्त जप करण्याची गरज नाही. ते थोडेसे केले पाहिजे, पण ते खऱ्या भक्तीने केले पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.

महाराजांनी कोहली आणि अनुष्काशी बराच वेळ गप्पा मारल्या. कोहली महाराजांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत होता. प्रेमानंद महाराजांना भेटल्यानंतर कोहली आणि अनुष्का खूप आनंदी दिसत होते. दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे भाव व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहेत.

Comments are closed.