विराट पुन्हा शिखरावर! आयसीसी वनडे क्रमवारीत पुन्हा नंबर वन

विराट कोहली—नावच पुरेसं आहे. वडोदऱ्यातील मैदानावर रविवारी पुन्हा एकदा कोहलीने सिद्ध केलं की वनडे क्रिकेटचा बादशहा आजही तोच आहे. न्यूझीलंडविरुद्ध ३०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना खेळलेली ९१ चेंडूंतील ९३ धावांची संयमी, आत्मविश्वासपूर्ण आणि विजयी खेळी विराटच्या विराटपणाची साक्ष देणारी ठरली. या खेळीसह कोहलीने केवळ हिंदुस्थानला मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना जिंकून दिला नाही, तर आयसीसीच्या वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत पुन्हा एकदा नंबर वनचा मुकुटही आपल्या शिरपेचात रोवला. विशेष म्हणजे कोहलीने ही कामगिरी रोहित शर्माला मागे टाकत साध्य केली.

अकराव्यांदा शिखरावर

कोहलीने आयसीसी वनडे क्रमवारीत अकराव्यांदा अव्वल स्थान पटकावले आहे. ऑक्टोबर २०१३ मध्ये त्याने पहिल्यांदा हा मान मिळवला होता. आतापर्यंत तो एकूण ८२५ दिवस नंबर वन राहिला आहे. हा विक्रम कोणत्याही हिंदुस्थानी फलंदाजाने केलेला सर्वाधिक काळ आहे. जागतिक यादीत कोहली दहाव्या क्रमांकावर असून, या यादीत अव्वल स्थानावर वेस्ट इंडीजचा महान फलंदाज विवियन रिचर्ड्स (२३०६ दिवस) आहे.

वनडेमधील कोहलीचा सुवर्णकाळ

वडोदऱ्यातील सामन्याआधीच कोहलीचा फॉर्म अत्यंत प्रभावी होता. त्याने गेल्या चार सामन्यांत ७४, १३५, १०२ आणि ६५ नाबाद अशा खेळ्या साकारल्या होत्या. ही आकडेवारी प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या काळजात धडकी भरवणारीच होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या केवळ वनडे प्रकारात सक्रिय असलेला कोहली या फॉरमॅटला अक्षरशः एकट्याच्या बळावर भारून टाकत आहे.

रोहित घसरला, मिशेल जवळपास

या सामन्यात केवळ २६ धावा करणाऱ्या रोहित शर्माला अव्वल स्थान गमवावे लागले असून तो थेट तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. न्यूझीलंडकडून ७१ चेंडूंमध्ये ८४ धावा करणारा डॅरिल मिशेल दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. मात्र गुणांतील अंतर अत्यंत कमी आहे. कोहलीकडे ७८५, मिशेलकडे ७८४ आणि रोहितकडे ७७५ गुण असून तिन्ही फलंदाज अगदी जवळ आहेत. आगामी सामन्यातील कामगिरीनंतर ही क्रमवारी पुन्हा बदलू शकते.

Comments are closed.