…तर मी वर्ल्ड कपमध्ये नसेन, 2027 वर्ल्ड कपवर विराट कोहलीचा इशारा
2027 चा वर्ल्ड कप खेळणार का म्हणून वारंवार प्रश्न विचारणाऱ्या साऱ्यांना विराट कोहलीने थेट उत्तर दिलं. जर मला सतत माझी किंमत आणि महत्त्व सिद्ध करायला लावलं तर मी अशा वातावरणात खेळू शकणार नाही. सन्मान आणि विश्वास दोन्ही बाजूंनी असायला हवा, असे सांगत ‘क्रिकेट किंग’ विराट कोहलीने आयपीएलच्या मैदानानंतर आता हिंदुस्थानी क्रिकेटमध्येही आग लावली. त्याच्या वाक्यात राग होता, नाराजी होती, इशारा होता अन् स्वाभिमानही होता. त्याच्या वक्तव्यानंतर हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये नवा वाद पेटण्याची दाट शक्यता आहे.
मात्र विराट पुढच्या वाक्यात सारंकाही बोलून गेला. ‘जर मला सतत माझी किंमत आणि महत्त्व सिद्ध करायला लावलं तर मी त्या वातावरणाचा भाग राहू इच्छित नाही. सन्मान आणि विश्वास हा दोन्हीकडून हवा, असे त्याचे स्पष्ट मत आहे. या वाक्यामुळे कोहली आणि बीसीसीआय यांच्यात सारंकाही ओके नसल्याचे दिसत आहे आणि त्याला सन्मान मिळाला नाही तर तडकाफडकी कसोटी क्रिकेटला निवृत्ती देणारा विराट 2027 च्या वर्ल्ड कपबाबतही काहीही निर्णय घेऊ शकतो.
विराटने पुढे एका वाक्यात अनेकांना सुनावले, एक दिवस तुम्ही म्हणता मी संघासाठी महत्त्वाचा आहे आणि दुसऱया दिवशी माझ्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करता. हे योग्य नाही. जर मी चांगला नसेन तर पहिल्याच दिवशी सांगा. कोहलीच्या या वक्तव्याकडे अनेकांनी बीसीसीआय, निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला दिलेला थेट संदेश म्हणून पाहिले आहे.
मलमपट्टी रूममध्ये सर्व काही आलबेल?
गेल्या काही महिन्यांत रोहित शर्मा विराट आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. रोहितची अचानक कर्णधारपदावरून हकालपट्टी, विराट-रोहितचे टेस्टमधून निवृत्तीचे निर्णय आणि 2027 वर्ल्ड कपबाबत साशंकता यामुळे वातावरण आधीच तापले होते. विराटच्या या मुलाखतीने त्या चर्चांना आणखी खतपाणी मिळाले आहे.
धावांचा विराट बादशहा!
311 वन डेमध्ये तब्बल 14,797 धावा, 54 शतके आणि जवळपास 59 ची सरासरी, ही विराटची आकडेवारी आजही प्रतिस्पर्ध्यांच्या छातीत धडकी भरवणारी आहे. गेल्या वर्षीही तो हिंदुस्थानचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. म्हणजेच वय वाढलं असलं तरी ‘किंग कोहली’चा दरारा अजून कायम आहे. एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे विराट अजून निवृत्तीच्या मूडमध्ये नाही, पण त्याला फक्त सन्मान आणि विश्वास हवाय.
अजूनही क्रिकेटचा भुकेला
आजही धावांबरोबर शतकांचीही भुकेला असल्याचे विराट कोहलीने कोलकात्याविरुद्धही दाखवून दिले होते. या शतकानंतर आरसीबीच्या एका पॉडकास्टमध्ये विराटने आपल्या मनातील सर्व भावना क्रिकेटप्रेमींसमोर ठेवल्या. त्या पॉडकास्टमध्ये तो म्हणाला, मी कोणतीही मालिका खेळण्यासाठी नेहमी तयार असतो. फिटनेस, व्यायाम, आहार हा माझा रोजचा भाग आहे. मी क्रिकेटसाठी जगत नाही, तर अशी जीवनशैली मला आवडते. त्यामुळे मला विचारलं जातं, 2027 वर्ल्ड कप खेळणार का? पण अजून आपण 2026 मध्येच आहोत. मी अजूनही क्रिकेटसाठी तितकाच भुकेला आहे. जर मी खेळतोय तर मला क्रिकेट खेळायचंच आहे. हिंदुस्थानसाठी विश्वचषक खेळणं हा अभिमानाचा क्षण असतो. या वाक्यामुळे कोहली वर्ल्ड कप खेळणार हे निश्चित आहे.
Comments are closed.