IND vs SA: रायपूरमध्ये शतक ठोकत विराटने मोडले 3 मोठे रेकॉर्डस! हा वर्ल्ड रेकॉर्ड करणारा ठरला पहिला भारतीय

विराट कोहली (Virat Kohli) शतकानंतर शतक मारून विक्रम मोडत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने आतापर्यंत दोन्ही सामन्यांत शतक झळकावले आहे. रांचीमध्ये 135 धावा आणि आता रायपूरमध्ये त्याच्या बॅटमधून 102 धावांची शतकी खेळी निघाली आहे. आपल्या वनडे (ODI) कारकिर्दीतील 53 वे शतक ठोकून ‘किंग कोहली’ने काही नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्याने एक वर्ल्ड रेकॉर्ड देखील केला आहे.

विराट कोहलीच्या 102 धावा आणि ऋतुराज गायकवाडच्या 105 धावांच्या शतकी खेळीमुळे टीम इंडियाने दुसऱ्या वनडेत 358 धावांचा मोठा स्कोअर उभा केला होता.

विराट कोहलीने आपल्या बहुतेक वनडे कारकिर्दीत नंबर-3 वर फलंदाजी केली आहे.
तो आता वनडे क्रिकेटमध्ये नंबर-3 वर फलंदाजी करताना 46 शतके झळकावून एक वर्ल्ड रेकॉर्ड बनला आहे. यापूर्वी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम भारताच्याच सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर होता. तेंडुलकरने नंबर-3 वर फलंदाजी करताना 45 वनडे शतके केली होती.

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 33 वनडे सामने खेळले असून, 31 डावांत त्याने 1741 धावा केल्या आहेत.
तो वनडे क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक 50 किंवा त्याहून अधिक (50+) स्कोअर करणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. रायपूरमध्ये विराटने 31 डावांत एकूण 15 व्यांदा 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या. यापूर्वी कोणत्याही भारतीय फलंदाजाने अशी कामगिरी केलेली नाही.

रायपूर हे 34 वे ठिकाण आहे, जिथे विराट कोहलीने वनडे शतक झळकावले आहे. सर्वाधिक वेगवेगळ्या मैदानांवर शतक करण्याचा विक्रम करणाऱ्यांमध्ये विराट कोहलीने आता सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. सचिन तेंडुलकरनेही आपल्या वनडे कारकिर्दीत 34 वेगवेगळ्या ठिकाणी (मैदानांवर) शतक झळकावले होते.

Comments are closed.