Virat Kohli vs Sam Konstas – मेलबर्नमध्ये वातावरण तापलं, 19 वर्षीय खेळाडूला भिडला कोहली, ICC ची मोठी कारवाई

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावस्कर मालिका सुरू आहे. पाच सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत असून आजपासून उभय संघांमध्ये बॉक्सिंग डे कसोटीला सुरुवात झाली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 6 बाद 311 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून आघाडीच्या चारही फलंदाजांनी अर्धशतकीय खेळी केली. खेळ संपला तेव्हा स्टीव्ह स्मिथ 68 आणि पॅट कमिन्स 8 धावांवर नाबाद होता. यासह विराट कोहली आणि 19 वर्षीय सॅम कॉन्सटस यांच्यातील खुन्नसही पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. अर्थात यामुळे विराट कोहली याच्यावर आयसीसीने कारवाईही केली आहे.

मेलबर्न कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने 19 वर्षीय सॅम कोन्सटस याला संघात स्थान दिले. मॅकस्विनीच्या जागी संधी मिळालेल्या कोन्सटसनेही उस्मान ख्वाजाच्या मदतीने ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली. कोन्सटसने तर जसप्रीत बुमराह याला रिव्हर्स स्विप करत षटकार ठोकले. ऑस्ट्रेलियाची 10 षटके झाल्यानंतर बॅटर स्ट्राईक बदलत असताना कोहली आणि कोन्सटसमध्ये वाद झाला. विराट कोहली याने कोन्सटसला धक्का दिला. त्यामुळे मेलबर्नच्या मैदानावरील तापमान काही काळासाठी चांगलेच वाढले होते.

आता पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आयसीसीने याप्रकरणी विराट कोहली याच्यावर कारवाई केली आहे. आयसीसीने विराट कोहली याला मॅच फीच्या 20 टक्के रक्कम दंड ठोठावला असून त्याला एक डिमेरिट अंकही दिला आहे. आयसीसीने विराटवर सीओसी आर्टिकल 2.12 अंतर्गत कारवाई केली आहे. अर्थात अशा प्रकारच्या वादात खेळाडूला एका सामन्यासाठी निलंबित करण्याचीही तरतूद आहे. मात्र आयसीसीने विराटला फक्त दंड ठोठावला आहे. त्यामुळे चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असून विराटचा पुढची कसोटी खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Comments are closed.