5 वर्षात 3 शतकं? विराटच्या निवृत्तीचा काळ खरंच जवळ आलाय?

भारताचा दिग्गज क्रिकेटर रोहित शर्माने (Rohit Sharma) बुधवारी (7 मे) रोजी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आता विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) याबद्दल माहिती देखील दिली आहे.

शनिवारी, (10 मे) रोजी सकाळी हा रिपोर्ट वाचून भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला. कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीची बातमी चाहत्यांना अद्याप पचवता आली नव्हती तोपर्यंत विराट कोहलीबद्दल अशा बातम्या येऊ लागल्या. बीसीसीआयच्या उच्च अधिकाऱ्यांनी विराटला निवृत्तीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता विराट आपला निर्णय बदलेल की नाही हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.

कोहली आपले निर्णय खूप विचारपूर्वक घेतो. जेव्हा त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हाही बीसीसीआयने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो मान्य झाला नाही.

कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीची बॅट गेल्या काही काळापासून शांत आहे. गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वारंवार एकाच पद्धतीने बाद झाल्याने तो बराच निराश झाला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर तो विकेटच्या मागे बाद होत होता. मालिकेच्या पहिल्या सामन्यात कोहलीने शतक झळकावले असेल, परंतु त्यानंतर त्याची कामगिरी खूपच खराब होती. या मालिकेत भारताला 1-3 असा पराभव पत्करावा लागला. त्याआधी, जेव्हा न्यूझीलंडने भारताला त्यांच्याच भूमीवर 3-0 असा व्हाईटवॉश दिला होता, तेव्हाही कोहलीची बॅट शांतच होती. तो 3 सामन्यांमध्ये एकत्रितपणे 100 धावा करू शकला नाही. त्याच्या बॅटमधून 15.50च्या सरासरीने फक्त 93 धावा आल्या. या दोन्ही मालिकांमुळे विराट कोहलीला हा निर्णय घ्यावा लागला.

2011 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीने (Virat Kohli) 2019 पर्यंत कसोटी क्रिकेटवर राज्य केले. या काळात त्याची फलंदाजीची सरासरी (54.97) जवळपास 55 होती. यादरम्यान त्याने 27 शतके झळकावली होती. तो फॅब-4 मध्ये जो रूट, केन विल्यमसन आणि स्टीव्ह स्मिथपेक्षा जास्त शतके ठोकणारा खेळाडू होता. पण 2020 सुरू होताच, त्याच्या कामगिरीत सतत घसरण दिसून आली. (1 जानेवारी 2020) पासून विराटच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, त्याने 39 सामन्यांमध्ये 30.72च्या सरासरीने फक्त 2,028 धावा केल्या आहेत. त्याच वेळी, या काळात त्याच्या बॅटमधून फक्त 3 शतके आली. कसोटी क्रिकेटमधील त्याच्या घसरत्या फॉर्मवरून असे दिसून येते की त्याची निवृत्तीची वेळ जवळ आली आहे.

खरंतर, भारतीय संघाला सध्या विराटची गरज आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर, विराट कोहली हा संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. जर तोही निवृत्त झाला तर शुबमन गिल, केएल राहुल, यशस्वी जयस्वाल आणि रीषभ पंत यांच्यासह कमी अनुभवी फलंदाजी पथक इंग्लंड दौऱ्यावर जाईल. त्यामुळे विराट आता काय निर्णय घेतो? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Comments are closed.