सचिन तेंडुलकरचा जागतिक विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर विराट कोहली, 25 धावा पूर्ण करताच रचणार नवा इतिहास!

विराट कोहलीने जरी कसोटी आणि टी20 क्रिकेटमधून संन्यास घेतला असला, तरी तो वनडे क्रिकेटमध्ये बॅटने चांगलीच फटकेबाजी करत आहे. नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत विराटने 3 सामन्यांत दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले होते.

कोहली आपल्या कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर आहे, जिथे तो प्रत्येक सामन्यासोबत एक नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या आगामी वनडे मालिकेतही ‘किंग कोहली’कडे सचिन तेंडुलकरचा एक ‘विराट’ विक्रम मोडीत काढण्याची सुवर्णसंधी असेल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त 2 असे फलंदाज आहेत, ज्यांनी 28 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. हे फलंदाज सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा आहेत. कोहली या यादीत पोहोचण्यापासून फक्त 25 धावा दूर आहे. सचिनने हा टप्पा 644 व्या डावात गाठला होता.

दुसरीकडे, संगकाराने ही कामगिरी 666 व्या डावात केली होती. विराटने 623 डावांमध्ये आतापर्यंत 27975 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत जर कोहली 25 धावा करण्यात यशस्वी झाला, तर तो सर्वात वेगाने 28 हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज बनेल. याद्वारे विराट सचिनचा महाविक्रम मोडीत काढेल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत विराटची कामगिरी अप्रतिम राहिली होती. पहिल्या वनडेत विराटने शानदार फलंदाजी करत 120 चेंडूत 135 धावांची लाजवाब खेळी केली होती. दुसऱ्या वनडेतही किंग कोहलीने 93 चेंडूत 102 धावांची वेगवान खेळी साकारली होती. मालिकेतील शेवटच्या सामन्यात विराटने 45 चेंडूत 65 धावांची तुफानी खेळी खेळून टीम इंडियाला दणदणीत विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Comments are closed.