भावाची हवा! मैदानात घुसून थेट विराट कोहलीच्या खांद्यावर हात ठेवला, डान्सही केला; Video व्हायरल
हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया संघात मेलबर्नमध्ये सुरू असलेली चौथ्या कसोटीत यजमान संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा उभारत दुसऱ्या दिवस अखेर हिंदुस्थानचे 5 गडी बाद केले. हिंदुस्थानची आघाडीची फळी माघारी परतली असून ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा नाबाद आहेत. स्टीव्ह स्मिथचे शतक आणि यशस्वी जैस्वालचे अर्धशतक हे दुसऱ्या दिवसाचे ठळक वैशिष्ट्य ठरले. मात्र तत्पूर्वी दिवसाचा खेळ सुरू होताच एक चाहता थेट मैदानात घुसला आणि त्याने विराट कोहलीला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर विराटच्या खांद्यावर हात ठेऊन डान्सही केला. हा प्रकार निदर्शनास येताच सुरक्षारक्षकांनी उचलबांगडी करत त्याला मैदानाबाहेर काढले.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रादरम्यान सुरक्षा रक्षकांना चकमा देत एक चाहता मैदानात घुसला. सर्वात आधी तो रोहित शर्माजवळ गेला आणि नंतर त्याने विराट कोहलीजवळ जात त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विराटच्या खांद्यावर हात ठेवत त्याने डान्सही केला. याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. या चाहत्याच्या टी-शर्टवर FREE असे लिहिण्यात आलेले होते.
अखेरच्या मिनिटात घसरगुंडी
दरम्यान, हिंदुस्थानने दुसऱ्या दिवस अखेर 5 बाद 164 धावा केल्या आहेत. ऋषभ पंत 6 आणि रविंद्र जडेजा 4 धावांवर नाबाद आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यास काही षटकं बाकी असताना हिंदुस्थानला तीन धक्के बसले. आधी यशस्वी जैस्वाल 82 धावांवर धावबाद झाला, त्यानंतर विराट कोहलीने 36 धावांवर माघारी परतला, नाईट वॉचमन म्हणून आलेला आकाशदीप तर भोपळाही फोडू शकला नाही.
Comments are closed.