सगळे फेल, विराट कोहली एकटा नडला; न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धू-धू धुतले, ठोकले झंझावाती 54 वे शत

विराट कोहलीने 54 वे वनडे शतक झळकावले: भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात आपल्या बॅटची जादू पुन्हा एकदा दाखवून दिली. कोहलीने शनिवारी अवघ्या 91 चेंडूत शानदार शतक झळकावले. हे त्याचे कारकिर्दीतील 54 वे एकदिवसीय शतक असून न्यूझीलंडविरुद्धचे सातवे शतक ठरले आहे.

विराटची आक्रमक खेळी

कोहलीने सुरुवातीला 51 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर गिअर बदलत 91 चेंडूत शतक गाठले. त्याच्या या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. टीम इंडियाची पडझड होत असताना कोहलीला नितीश कुमार रेड्डीची मोलाची साथ लाभली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 88 धावांची भागीदारी केली. नितीशने 57 चेंडूत 53 धावांचे (2 चौकार, 2 षटकार) महत्त्वपूर्ण योगदान दिले.

भारताची खराब सुरुवात

338 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या 11 धावांवर बाद झाला. त्यानंतर फॉर्मात असलेला कर्णधार शुभमन गिल (23) काइल जेमिसनचा शिकार ठरला. श्रेयस अय्यर (3) आणि मागील सामन्यातील शतकवीर केएल राहुल (1) स्वस्तात बाद झाल्याने भारताची अवस्था 71/4 अशी बिकट झाली होती.

मधली फळी अपयशी

नितीश रेड्डी बाद झाल्यानंतर अनुभवी रवींद्र जडेजाकडून अपेक्षा होत्या, परंतु तो केवळ 12 धावा करून माघारी परतला. एका बाजूने विराट कोहली किल्ला लढवत असताना दुसऱ्या बाजूने ठराविक अंतराने विकेट्स पडत गेल्याने भारतीय संघावर दडपण वाढले. पण भारताने 41 व्या षटकात 240 धावा पूर्ण केल्या. विराट कोहली आणि हर्षित राणा क्रीजवर आहेत.

न्यूझीलंडविरुद्ध कोहलीची कामगिरी

न्यूझीलंडविरुद्ध कोहलीची एकदिवसीय सामन्यात शानदार कामगिरी झाली आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत या संघाविरुद्ध चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने किवींविरुद्ध आतापर्यंत 36 सामन्यांमध्ये 57 पेक्षा जास्त सरासरी आणि 95 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 1,850 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यात 7 शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. या संघाविरुद्ध त्याची सर्वोत्तम कामगिरी 154 धावांची नाबाद आहे.

डगआऊटमध्ये गौतम गंभीरने काय केलं?

विराटच्या या लढाऊ बाण्याने डगआउटमध्ये बसलेला मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर देखील भारावून गेल्याचे दिसले. विराटचे शतक पूर्ण होताच गंभीरने दिलेली दाद आणि त्याची ‘रिॲक्शन’ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मैदानातील त्यांच्यातील जुना वाद विसरून गंभीरने ज्या पद्धतीने विराटच्या खेळीचे कौतुक केले, त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

हे ही वाचा –

Rohit Sharma Ind vs Nz 3rd ODI : नशिबाने साथ दिली, पण फॉर्मने पाठ फिरवली! रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत सगळं गमावलं, एकूण किती धावा केल्या?

आणखी वाचा

Comments are closed.