VIDEO: 'विदेशी खेळाडू' म्हणून टोमणा मारणाऱ्यांना विराट कोहलीचे सडेतोड उत्तर; म्हणाला, “तुम्ही हे मला…”

आयपीएल २०२६ मध्ये विराट कोहलीने प्रभावी सुरूवात केली. त्याने सनरायझर्स हैद्राबाद (एसआरएच) विरुद्धच्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (आरसीबी) सामना जिंकून देण्यात महत्वाची भुमिका पार पाडली. त्याच्या या कामगिरीमुळे संघाचे विजेतेपद कायम राखण्याचा प्रयत्न दिसत आहे. आरसीबीने २०२५ हंगामात आपले पहिले आयपीएल विजेतेपद पटकावले होते.

विराटने या हंगामासाठी अधिक तयारी न करताच स्पर्धेत प्रवेश केला. जानेवारीमध्ये भारताच्या शेवटच्या वनडे मालिकेनंतर इंग्लंडला जाण्याआधी त्याने काही विश्रांती घेतली आणि त्यानंतर तो लंडनला आपल्या कुटुंबासोबतच होता. भारतात सततच्या प्रसिद्धपासून दूर राहण्याच्या उद्देशाने त्याने हा निर्णय घेतला असून त्याचा त्याच्या कामगिरीवर काहीही परिणाम झाला नाही, असे दिसते. तो सातत्याने मैदानावर भारतासाठी आणि आता आरसीबीसाठी उत्तम कामगिरी करत आहे.

विराट लंडनमध्ये स्थायिक झाल्यापासून सोशल मीडियावर त्याच्या चर्चा सुरू झाल्या. काहींनी त्याची खिल्लीही उडवली. आपल्या लोकप्रिय ‘मिस्टर नॅग्स’ अवतारात दिसलेल्या दानिश सैटसोबत हलक्याफुलक्या संभाषणात आरसीबी संघात पाच विदेशी खेळाडू आहे, असे विराटला विचारण्यात आले.

यावर विराट म्हणाला, “मला माहित नाही, तुम्ही हे मला का विचारत आहात? विदेशी खेळाडूंना विचारा. मी विदेशी खेळाडू नाही. मी आहे का विदेशी खेळाडू?”

या संभाषणात विराटने आरसीबीच्या बहुप्रतिक्षित विजेतेपदाबाबतही त्याचे विचार व्यक्त केले. त्याने अनेक वर्ष हुकलेल्या या विजयानंतर मिळाल्यालेल्या भावनिक दिलासाबद्दल सांगितले. तो म्हणाला, “विजय म्हणजे कठोर परिश्रम, खेळाप्रती असलेली निष्ठा आणि त्यासाठी केलेले सर्व त्याग. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रकारचा दिलासा, एक बक्षीस, ज्यामुळे आपल्याला कळते की आपला वेळ वाया गेला नाही. बरेच लोक पराभवातून शिकतात, काही निराश होतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही खूप मेहनतीनंतर केलेल्या कामाला न्याय मिळाल्याची भावना येते आणि अधिक मेहनत करण्याची प्रेरणाही मिळते.”

आयपीएल २०२६ च्या पहिल्या सामन्यात आरसीबीला एसआरएचने २०२ धावसंख्येचे लक्ष्य दिले होते. तेव्हा विराटने सलामीला येत नाबाद ६९ धावा केल्या.

Comments are closed.