विराटमुळेच कसोटी क्रिकेटमध्ये उत्साह, अचानक निवृत्तीमुळे माजी इंग्लिश कर्णधार वॉन स्तब्ध

विराट कोहलीच्या अचानक निवृत्तीमुळे अवघं क्रिकेट विश्व हळहळलं आहे. विराट इतका फिट खेळाडू आहे की तो सहज आणखी तीन-चार वर्षे क्रिकेट खेळला असता, अशाच भावना जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू व्यक्त करत असताना इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनलाही विराट निर्णयाचा धक्का बसला आहे. विराटमुळेच कंटाळवाण्या होत असलेल्या कसोटी क्रिकेटमध्ये उत्साह संचारला. जेवढे त्याने कसोटी क्रिकेटसाठी केलेय, तितके अन्य कुणीही करू शकला नसल्याची भावना वॉनने बोलून दाखवली.
विराटच्या निवृत्तीला आता तीन दिवस झालेत, पण जगभरातील महान आणि दिग्गज क्रिकेटपटू या घटनेबद्दल दुःख व्यक्त करताहेत. कुणी आपल्या ‘यूटय़ूब’ चॅनलवर भावना व्यक्त करतोय, तर कुणी क्रीडावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलका होतोय. काहींनी तर आपल्या ब्लॉग आणि कॉलममध्ये विराटपर्वाची बाजू मांडत निवृत्तीचा निर्णय वाईट असल्याची भावना व्यक्त केलीय. वॉननेसुद्धा आपल्या एका कॉलममध्ये विराटवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केलाय. त्याने लिहिलेय, जगातील काही मोजकेच खेळाडू आहेत, ज्यांच्या निवृत्तीमुळे खऱया अर्थाने दुःख झालंय. त्या खेळाडूला पुन्हा कधीही पांढऱ्या जर्सीमध्ये खेळताना पाहता येणार नाही. विराट निवृत्त होत असल्याच ऐकून मी स्तब्ध झालोय. दुःखी झालोय. या फॉरमॅटसाठी विराटने जितके केलेय, तितके कुणीही केलेले नाही.
तोच एकमेव खेळाडू आहे ज्याने लोकांना कसोटी क्रिकेटवर प्रेम करायला शिकवलेय. तो नसता तर कसोटी क्रिकेट खरंच कंटाळवाणे असते. पण याच खेळाडूंने फॉरमॅटमध्ये उत्साह भरलाय. एक दशकापूर्वी तो कसोटी क्रिकेटचा कर्णधार बनला तेव्हा मला वाटलं की, हिंदुस्थानची कसोटी क्रिकेटमधली आवड कमी होतेय. महेंद्रसिंग धोनी कसोटी क्रिकेटमधला महान खेळाडू आहे, परंतु त्याने अशा कसोटी संघाचे नेतृत्व केले, ज्यांना या फॉरमॅटवर प्रेम नव्हते. हिंदुस्थानची कसोटीतील आवड या खेळासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि कर्णधार म्हणून विराटने तेच केले. विराटचे कसोटी क्रिकेटमधून जाणं हा एक हिंदुस्थानीच नव्हे तर अवघ्या क्रिकेटविश्वाला एक जबर धक्का आहे. विराटनेच नव्या पिढीला कसोटी क्रिकेटवर प्रेम करायला शिकवलेय. टी-20 क्रिकेटच्या आगमनानंतर तिन्ही क्रिकेटमधील सर्वोत्तम महान क्रिकेटपटू म्हणून विराट कोहलीचे नाव सर्वात वरच्या क्रमांकावर असल्याचे वॉनने आपल्या लेखात लिहिलेय.
Comments are closed.