यंदा कोहलीची विराट स्वप्नपूर्ती? गेली 18 वर्षे विराट स्वप्नाच्या मागेच धावतोय

विराट कोहलीने गेल्या दहा महिन्यांत दोन जागतिक जेतेपदे उंचावण्याचा मान मिळवलाय, आता त्याचे गेले 18 वर्षांचे आयपीएलचा करंडक उंचावण्याचे स्वप्नही त्याची वाट पाहतेय. विराटचा परफॉर्मन्स आणि बंगळुरूची बेधडक कामगिरी पाहता जे गेल्या 17 वर्षांत झाले नाही ते 18 व्या वर्षात होणार, असे अंदाज क्रिकेटचे ज्येष्ठ-श्रेष्ठ वर्तवू लागले आहेत आणि हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींचीही तीच इच्छा आहे, होऊ दे विराट स्वप्नपूर्ती.
विराट हा आयपीएलचा एकमेव खेळाडू आहे, जो गेली 18 वर्षे एकाच संघाकडून न थकता खेळतोय. विराटचा हा पराक्रम ना महेंद्रसिंग धोनीला जमलाय ना रोहित शर्माला. मात्र या दोघांनी एकदा-दोनदा नव्हे तर चक्क पाच-पाच वेळा आयपीएल करंडकाचे चुंबन घेतलेय, जेतेपद पटकावलेय. याबाबतीत विराट कोहली मात्र नेहमीच अपयशी आणि दुर्दैवी ठरलाय.
बंगळुरू जबरदस्त जोशात
आयपीएलच्या गेल्या मोसमात बंगळुरूने सर्वांना आश्चर्याचा 440 वोल्टचा झटका दिला होता. सलग सहा पराभवानंतरही त्यांनी सलग सहा विजयांचा करिश्मा करत प्ले ऑफ गाठले होते. मात्र यावेळी ते सुरुवातीपासून जबरदस्त कामगिरी करताहेत. विशेष म्हणजे आता ते सलग चार विजयांसह पाच सामने अपराजित आहेत. आता त्यांचे टॉप टूमध्ये स्थान मिळवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत आणि त्यांचा वर्तमान खेळ आणि वेळ पाहता ते त्याच मार्गावर आहेत.
सर्वांची एकच इच्छा…
विराटच्या बंगळुरूने एकदा तरी आयपीएलचे जिंकावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे. खुद्द दिलीप वेंगसरकर यांनाही तसेच वाटतेय. गेल्या वर्षी विराटने हिंदुस्थानला टी-20 वर्ल्ड कपचे जेतेपद जिंकून दिले आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याचप्रमाणे वर्षाच्या प्रारंभी ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यामुळे हिंदुस्थानचे जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले. त्यामुळे विराटने गेल्याच आठवड्यात कसोटी क्रिकेटला रामराम केला. आता त्याचे स्वप्न बंगळुरूसाठी आयपीएल जिंकण्याचे आहे. या स्वप्नाची पूर्ती होताच तो आयपीएललाही अलविदा करू शकतो. म्हणजे त्याची इच्छा पूर्ण झाली तर त्याची आयपीएल फटकेबाजीही थांबू शकते. हे सारे जरतर असले तरी विराट या निर्णयापासून फार लांब नाही.
विराट खेळण्यात सबसे आगे…
विराट कोहली फलंदाजीत सर्वात पुढे आहे. कुणीही त्याच्या आसपास नाही. तो सर्वाधिक आयपीएल सामने खेळला नसला तरी त्याने 263 सामन्यांत सर्वाधिक 8509 धावा केल्या आहेत. त्याच्या खालोखाल रोहित शर्मा आहे, पण त्याने 269 सामन्यांत 6933 धावा केल्या आहेत. सर्वाधिक 277 सामने महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहेत. विराटच्या उपस्थितीत बंगळुरूने चक्क दहाव्यांदा प्ले ऑफ गाठलेय. एवढेच नव्हे तर ते तीनदा अंतिम फेरीत पोहोचलेत आणि तिन्ही वेळेला जेतेपदापासून दूरच राहिलेत. गेल्या आठ वर्षांत त्यांनी चारवेळा प्ले ऑफ गाठले, पण चारही वेळेला ते अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. सर्वात म्हणजे गेल्या आठ वर्षांत ते कधीही टॉप टूमध्ये नव्हते. त्यामुळे त्यांचे आव्हान अंतिम फेरीच्या आधीच संपलेय.
Comments are closed.