विराट कोहलीची शानदार फटकेबाजी! सचिन-पाँटिंगसारख्या दिग्गजांच्या विशेष क्लबमध्ये एन्ट्री

विराट कोहलीने (Virat Kohli) आपला उत्कृष्ट फॉर्म कायम राखत विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये आंध्र प्रदेशविरुद्ध शानदार शतक झळकावले. या खेळीसह कोहलीने लिस्ट-ए (List A) क्रिकेटमध्ये 16,000 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

बुधवारी ‘बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स’ मैदानावर दिल्लीकडून खेळताना विराट कोहलीने अवघ्या 101 चेंडूत 131 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार मारले. त्याच्या या शतकी खेळीमुळे दिल्लीने 4 गडी राखून विजय मिळवला.

लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 16,000 धावा करणारा विराट हा सचिन तेंडुलकरनंतरचा (Sachin Tendulkar) दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. जागतिक स्तरावर असा पराक्रम करणारा तो 9वा खेळाडू आहे. या यादीत रिकी पॉन्टिंग, कुमार संगकारा आणि सर विवियन रिचर्ड्स यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.

विराट कोहली जवळपास एका दशकानंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत आहे. यापूर्वी तो 2010-11 च्या हंगामात दिल्लीचा कर्णधार म्हणून खेळला होता.

दिल्लीच्या संघामध्ये विराटने प्रियांश आर्या (74 धावा) सोबत 113 धावांची आणि नितीश राणा (77 धावा) सोबत 159 धावांची भागीदारी केली. दिल्लीने 299 धावांचे लक्ष्य 37.4 षटकांतच पूर्ण केले. प्रथम फलंदाजी करताना आंध्रने 8 बाद 298 धावा केल्या होत्या. त्यांच्यासाठी रिकी भुईने 122 धावांची शतकी खेळी केली.
दिल्लीच्या गोलंदाजांनी सिमरजीत सिंहने उत्कृष्ट गोलंदाजी करत 5 बळी घेतले, तर प्रिन्स यादवला 3 विकेट्स घेतल्या.

Comments are closed.