किंग कोहलीचे अविश्वसनीय रेकाॅर्ड्स..! अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव फलंदाज
भारताचा दिग्गज क्रिकेटर आणि सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या 14 वर्षांच्या संस्मरणीय कसोटी कारकिर्दीचा शेवट केला आहे. सोमवारी (12 मे) विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विराट कोहली हा भारतात कसोटी क्रिकेटला रोमांचक करणारा खेळाडू म्हणून ओळखला जातो. केवळ खेळाडू म्हणूनच नाही तर कर्णधार म्हणूनही विराटने देशात आणि परदेशात घवघवीत यश मिळवले आहे. चला तर मग त्याच्या कसोटी कारकिर्दीतील महत्त्वाच्या कामगिरीवर एक नजर टाकूया.
कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये हे मोठे रेकाॅर्ड केले आहेत-
विराट कोहलीची कसोटी कारकिर्द 14 वर्षांची होती. 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पहिली कसोटी खेळणाऱ्या कोहलीने 2025 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये शेवटची कसोटी खेळली. या काळात त्याने 123 कसोटी सामन्यांच्या 210 डावांमध्ये 9,230 धावा केल्या आणि 30 शतके ठोकली. सचिन, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांच्यानंतर तो कसोटीत चौथा सर्वात यशस्वी भारतीय कसोटी फलंदाज आहे.
2014 ते जानेवारी 2022 पर्यंत कोहली भारतीय संघाचा कसोटी संघाचा कर्णधार होता. या दरम्यान त्याने 68 कसोटी सामन्यांचे नेतृत्व केले, ज्यामध्ये त्याने 40 सामन्यांमध्ये विजय मिळवला. संघाने 17 सामने गमावले तर 11 सामने अनिर्णित राहिले. विजयाची टक्केवारी 58.82% होती, जी कसोटीतील कोणत्याही भारतीय कर्णधारापेक्षा जास्त आहे.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर मालिकेत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. 2018-2019 मधील हा विजय भारताच्या कसोटी इतिहासाच्या 71 वर्षांच्या इतिहासात पहिला होता. तसेच, कोणत्याही आशियाई संघासाठी कसोटी सामन्यांमध्ये मिळवलेली ही पहिलीच कामगिरी होती.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ अतुलनीय होता. 2016 ते 2021 दरम्यान हा संघ आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने 2021 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC Final) सामना खेळला.
विराट हा कसोटीत सर्वाधिक 7 द्विशतके झळकावणारा भारतीय फलंदाज आहे. याशिवाय, कर्णधार म्हणून कसोटीतील सर्वात मोठ्या खेळीचा रेकाॅर्डही त्याच्या नावावर आहे. विराटने 2019 मध्ये पुण्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 254 धावांची खेळी खेळली.
विराट हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक 7 कसोटी शतके करणारा भारतीय फलंदाज आहे. 2014-15 च्या मालिकेत त्याने एका कसोटी मालिकेत सर्वाधिक 4 शतके ठोकण्याचा रेकाॅर्डही विराटच्या नावावर आहे.
विराटने 2015 ते 2017 दरम्यान सलग 9 कसोटी मालिका जिंकून रिकी पॉन्टिंगच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली. भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक 20 कसोटी शतकांचा रेकाॅर्ड कोहलीच्या नावावर आहे. त्याचबरोबर, तो जगातील एकमेव कर्णधार आहे ज्याच्या नावावर 7 द्विशतके आहेत.
विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीय कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक 5,864 धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्याची सरासरी 54.80 आहे. विराटने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील 47 कसोटींमध्ये 2,617 धावा केल्या आहेत. तो जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दुसरा यशस्वी भारतीय फलंदाज आहे.
2012, 2015, 2016, 2018 आणि 2023 मध्ये, विराटने इतर कोणत्याही भारतीय फलंदाजांपेक्षा जास्त कसोटी शतके झळकावली. आयसीसी कसोटी क्रमवारीत कोहली सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज आहे. 2018 मध्ये त्याने 937 गुण मिळवले. कसोटीत सलग दोन कॅलेंडर वर्षात 75 किंवा त्याहून अधिक सरासरीने 1,000 पेक्षा जास्त धावा करणारा कोहली हा एकमेव फलंदाज आहे. (Virat Kohli International Test Records)
Comments are closed.