IND vs NZ: इंदोरमध्ये किंग कोहलीची दमदार शतकी खेळी! सेहवाग आणि पाँटिंगचा महारेकॉर्ड उध्वस्त
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना इंदूरमध्ये खेळला गेला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 बाद 337 धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली.
रोहित शर्मा (Rohit Sharma & Shubman gill) आणि शुबमन गिल स्वस्तात बाद झाले, तर श्रेयस अय्यर (Shreyas iyer & KL Rahul) आणि केएल राहुललाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र, विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा टीम इंडियासाठी ‘संकटमोचक’ ठरला आणि त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 54 वे शतक झळकावले.
रोहित शर्मा बाद झाल्यावर विराट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. कोहलीने एक बाजू लावून धरली होती, पण दुसऱ्या टोकाकडून विकेट्स पडण्याचे सत्र सुरूच राहिले. कर्णधार शुबमन गिल 23 धावांवर बाद झाला, तर श्रेयस अय्यर फक्त 3 धावा करू शकला. गेल्या सामन्यात शतक झळकावणारा केएल राहुल या सामन्यात केवळ 1 धावेवर बाद झाला. पूर्ण मालिकेत बॅट आणि बॉल दोन्हीने अपयशी ठरलेला रवींद्र जडेजा(Ravindra jadeja) या सामन्यातही काही खास करू शकला नाही आणि 12 धावांवर माघारी परतला.
एका बाजूने विकेट्स पडत असताना विराटने आपली शानदार फलंदाजी सुरूच ठेवली. त्याने मैदानाच्या चारी बाजूंना सुरेख फटकेबाजी केली. अर्धशतकानंतर विराटने आक्रमक पवित्रा घेतला आणि अवघ्या 91 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. या शतकासह विराट कोहली आता न्यूझीलंडविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज ठरला आहे. त्याने एकाच वेळी रिकी पाँटिंग आणि वीरेंद्र सहवाग यांचा विक्रम मोडीत काढला आहे. या दोघांनीही न्यूझीलंडविरुद्ध 6-6 शतके झळकावली होती, तर विराटची आता 7 शतके झाली आहेत. विशेष म्हणजे, विराटच्या नावावर आता पाच वेगवेगळ्या देशांविरुद्ध 7 किंवा त्यापेक्षा जास्त शतके नोंदवली गेली आहेत.
Comments are closed.