विराट कोहलीचा मोठा विक्रम धोक्यात, स्टीव्ह स्मिथकडे सुवर्णसंधी!
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची ॲशेस मालिका खेळली जात आहे. आतापर्यंत या मालिकेतील तीन सामने झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने तिन्ही सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली आहे. चौथा सामना 26 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यात स्टीव्ह स्मिथला विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याची संधी असेल. तो ‘किंग कोहली’ला सहज मागे टाकू शकतो. जर स्मिथने कोहलीचा विक्रम मोडला, तर तो असा पराक्रम करणारा जगातील चौथा आणि ऑस्ट्रेलियाचा दुसरा खेळाडू ठरेल.
खरं तर, आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक झेल (Catches) घेणारा जगातील चौथा खेळाडू बनण्याची संधी स्टीव्ह स्मिथकडे आहे. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम महेला जयवर्धनेच्या नावावर आहे, ज्याने 440 झेल घेतले आहेत. या यादीत विराट कोहली 342 झेलांसह चौथ्या स्थानावर आहे. तर स्टीव्ह स्मिथ 341 झेलांसह पाचव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत, जर त्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात केवळ २ झेल घेतले, तर स्मिथ विराट कोहलीला मागे टाकेल.
विराट कोहली सध्या शानदार फॉर्ममध्ये
विराट कोहलीच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने अलीकडेच विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केले आणि आंध्र प्रदेशविरुद्ध शानदार शतकी खेळी केली. त्यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत कोहलीने 2 शतके आणि एक नाबाद अर्धशतक झळकावून 2027 च्या विश्वचषकासाठी आपला दावा मजबूत केला होता.
विराट कोहलीने आपल्या फलंदाजीद्वारे त्या लोकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे, जे त्याला एकाच फॉरमॅटमध्ये खेळण्याचा सल्ला देत होते. विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपला पुढचा सामना 26 डिसेंबरला गुजरातविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरेल.
Comments are closed.