'विराट-रोहित' निवृत्त झाल्यावर वनडे क्रिकेट इतिहासजमा? माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक इशारा

माजी भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने एकदिवसीय क्रिकेट (ODI)च्या भवितव्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. आपल्या यूट्यूब चॅनल ‘Ash Ki Baat’ वर क्रीडा पत्रकार विमल कुमार यांच्यासोबत चर्चा करताना अश्विनने 2027 च्या 50 षटकांच्या विश्वचषकानंतर या फॉरमॅटचे अस्तित्व टिकेल का, याबाबत शंका व्यक्त केली. सध्याच्या क्रिकेट विश्वात वनडे क्रिकेट हळूहळू आपली प्रासंगिकता आणि प्रेक्षकांची आवड गमावत चालले असल्याचे मत त्याने मांडले.

अश्विनच्या मते, सध्याचे वनडे क्रिकेट एकतर्फी बनत आहे. विशेषतः 10 ते 40 षटकांच्या मधल्या टप्प्यावर त्याने टीका केली. पॉवरप्लेनंतर सामना फारसा रोमांचक राहत नाही. फलंदाजांना सहजपणे धावा करता येतात, प्रत्येक षटकात बाउंड्री मिळते, तर गोलंदाजांकडे विकेट घेण्याच्या संधी मर्यादित राहतात. “वनडे क्रिकेट अडकलं नाही, पण हा एक महान फॉरमॅट हळूहळू ‘स्लो डेथ’कडे जात आहे,” असे परखड मत अश्विनने मांडले.

वनडे क्रिकेट वाचवण्यासाठी अश्विनने फुटबॉलमधील ‘फीफा मॉडेल’ स्वीकारण्याचा सल्ला दिला. फुटबॉलप्रमाणे क्लब लीग सातत्याने सुरू राहाव्यात आणि विश्वचषक चार वर्षांतून एकदाच खेळवावा, अशी त्याची कल्पना आहे. यासाठी द्विपक्षीय वनडे मालिका पूर्णपणे बंद कराव्यात, असेही त्याने सुचवले. यामुळे विश्वचषकाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि अपेक्षा वाढेल, असे अश्विनचे मत आहे. तसेच विजय हजारे ट्रॉफीसारख्या देशांतर्गत 50 षटकांच्या स्पर्धांचे महत्त्व वाढेल आणि आंतरराष्ट्रीय संघांना तिथूनच विश्वचषकासाठी खेळाडू निवडावे लागतील.

क्रिकेटच्या लेटेस्ट अपडेट व बातम्यांसाठी व्हाॅट्सअप ग्रुपला जाॅईन व्हा.- https://chat.whatsapp.com/LEwPKes7Mwv4e1L4Cyvhxh

तांत्रिक नियमांबाबतही अश्विनने बदलांची गरज व्यक्त केली. दोन नवीन चेंडू वापरणे आणि पाच फील्डर वर्तुळात ठेवण्याचा नियम गोलंदाजांसाठी अन्यायकारक असल्याचे त्याने सांगितले. यामुळे गोलंदाजांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गज खेळाडूंमुळे आजही वनडे क्रिकेट पाहिले जाते, मात्र त्यांच्या निवृत्तीनंतर या फॉरमॅटची लोकप्रियता आणखी घटेल, असे अश्विनचे मत आहे. त्यामुळे आयसीसीने वेळीच नवकल्पना केल्या नाहीत, तर वनडे क्रिकेट केवळ इतिहासातच उरेल, असा इशाराही त्याने दिला.

Comments are closed.