विराटचा विक्रम! ठरला वनडे क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

रोहित शर्मा (नाबाद 121) आणि विराट कोहली (नाबाद 74) यांच्या दमदार खेळीमुळे भारताने सिडनीत झालेल्या तिसऱ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. भारतीय संघाने फक्त 38.3 षटकांत एकच विकेट गमावून 237 धावांचे लक्ष्य गाठले. या सामन्यात ‘किंग’ कोहलीने इतिहास रचला आहे. तो सचिन तेंडुलकरनंतर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. विराटने श्रीलंकेच्या महान खेळाडू कुमार संगाकारा याला मागे टाकत हा भव्य विक्रम आपल्या नावावर केला.

विराट कोहलीच्या नावावर आता 305 वनडे सामन्यांत 57.71 च्या सरासरीने एकूण 14,255 धावा झाल्या आहेत. तर श्रीलंकेच्या माजी दिग्गज कुमार संगाकारा यांच्या नावावर 404 सामन्यांत 14,234 धावा आहेत. या यादीत पहिल्या स्थानावर ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर आहेत, ज्यांच्या नावावर 463 वनडे सामन्यांत तब्बल 18,426 धावा आहेत.

ऑस्ट्रेलियातील आठवणींबद्दल बोलताना विराट कोहली म्हणाला, “मला वाटतं हे सगळं 2013 मध्ये सुरू झालं. आम्ही (विराट आणि रोहित) जर मोठी भागीदारी केली, सुमारे 20 षटके एकत्र खेळलो, तर आम्हाला आधीच ठाऊक असायचं की आमच्या खेळीमुळे संघाच्या विजयात मोठा वाटा असेल, आणि प्रतिस्पर्धी संघालाही त्याची जाणीव व्हायची. आम्हाला या देशात येऊन खेळायला नेहमीच आवडतं, इथे आम्ही खूप चांगलं क्रिकेट खेळलो आहोत. आमच्या समर्थनासाठी आलेल्या सर्व ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार. थँक यू ऑस्ट्रेलिया.”

भारतातील संघाने तिसऱ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियावर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्माने 121 धावांची विजयी खेळी खेळत टीम इंडियाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. तर दुसऱ्या बाजूला विराट कोहलीनेही 74 धावांची अर्धशतकी खेळी करून नाबाद परतला. भारताने सिडनीत झालेला तिसरा वनडे सामना जिंकला असला, तरी मालिकेवर 2-1 ने ऑस्ट्रेलियाने कब्जा केला. ही शुबमन गिलच्या वनडे कर्णधारपदाखालील पहिली विजयाची नोंदही ठरली.

Comments are closed.