गाथेच्या शोधात- तांत्रिक प्रवाहाचे मूर्त रूप
>> विशाल फुटाणे
शिवोपासनेच्या गूढ परंपरेचे दर्शन घडवणारी शिल्परचना नुकतीच अक्कलकोटमधील बोरगावात सापडली. शिल्पनैपुण्याचे उदाहरण ठरणारी ही रचना, हा प्रदेश विविध शैव संप्रदायांच्या प्रभावाखाली होता याची साक्षच देते.
सोलापूर जिह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव या गावाने अलीकडेच शैव परंपरेच्या अभ्यासकांना थक्क करून सोडले आहे. येथे सापडलेले एकविंशति अष्टादशमुख लिंग हे केवळ एक शिल्प नसून तांत्रिक शिवोपासनेच्या गूढ परंपरेचे जिवंत साक्षीपत्र आहे. एका अखंड दगडातून कोरलेली ही अद्वितीय रचना लांबून पाहताना जणू एखादा विराट नाग शिवलिंगाभोवती वेटोळे घालून बसला आहे, असा भास निर्माण करते. जवळ गेल्यावर मात्र त्यातील सूक्ष्म रचना, तांत्रिक प्रतीके आणि शिल्पनैपुण्य मनाला स्तब्ध करून टाकतात.
या लिंगरचनेच्या मध्यभागी एक प्रमुख महालिंग उभे आहे-परमशिवाचे प्रतीक. त्याभोवती अचूक सममितीत कोरलेली वीस लहान उपलिंगे दिसतात. अशा प्रकारे एकूण एकवीस लिंगांची ही रचना ‘एकविंशति रुद्रलिंग मंडल’ म्हणून ओळखली जाऊ शकते. लिंगाच्या पायथ्याशी तरंगाकार योनिपीठ आहे, जे सृष्टीतत्त्वाचे, शिव-शक्ती संयोगाचे आणि ब्रह्मांडीय ऊर्जेच्या अखंड प्रवाहाचे प्रतीक मानले जाते. या संपूर्ण मंडलाभोवती अठरा उग्र मुख कोरलेली आहेत. प्रत्येक मुख वेगळ्या भावमुद्रेत, कधी रौद्र, कधी अघोर, कधी भीषण. जणू शिवाच्या अष्टादश तांत्रिक रूपांचे सजीव दर्शन घडवते.
शैव आगम आणि तांत्रिक ग्रंथांमध्ये बहुलिंग व बहुमुखी लिंगांचे उल्लेख विखुरलेल्या स्वरूपात आढळतात. स्कंद पुराण आणि कालिका पुराण यांसारख्या ग्रंथांत शिवाच्या विविध रूपांची आणि बहुलिंग संकल्पनेची चर्चा आहे; परंतु एकाच अखंड दगडात एकवीस लिंग आणि अठरा मुख यांची एकत्रित, सुसंगत आणि शास्त्रीय रचना प्रत्यक्षात पाहायला मिळणे अत्यंत दुर्मीळ आहे. तांत्रिक परंपरेत 21 रुद्रतत्त्वे आणि 18 उग्र शक्तिरूपे यांचा उल्लेख आढळतो. कपाली, अघोर, रौद्र, ईशान, पशुपती, कालभैरव अशी शिवरूपे केवळ नामरूपे नसून विशिष्ट साधना, शक्तिपात, संहारिक उपासना, ग्रामरक्षण आणि ग्रहशांती विधींशी निगडित मानली जातात.
भारतात इतरत्र काही बहुलिंग किंवा बहुमुखी उदाहरणे दिसतात, पण बोरगावच्या रचनेइतकी साकल्यपूर्ण नाहीत. श्रीशैलम मंदिर येथे रुद्रलिंगमंडल आहे, परंतु अष्टादशमुखी स्वरूप नाही. बदामी गुंफा परिसरात लहान लिंगसमूह आहेत, तर महाकालेश्वर मंदिर परिसरात तांत्रिक प्रभाव असलेल्या बहुलिंग रचना दिसतात; मात्र एकवीस लिंग आणि अठरा मुख अशी संयुक्त शिल्परचना अद्याप ज्ञात नाही. कोटिलिंगेश्वर मंदिर येथे असंख्य लिंगे आहेत, परंतु ती स्वतंत्र स्थापनेची आहेत-एकाच पिंडीवर बहुरूपात्मक कोरीव मंडल नाही. या सर्व तुलनेत बोरगावचे लिंग आपली वेगळी ओळख ठळकपणे निर्माण करते.
इतिहासाच्या दृष्टीने सोलापूर, विजयपूर आणि कलबुर्गी परिसर मध्ययुगीन काळात विविध शैव संप्रदायांच्या प्रभावाखाली होता. कपालिक, कालमुख, अघोरी आणि नाथपंथीय परंपरांचे ठसे या प्रदेशात सापडतात. श्मशानसाधना, मंत्रजप, यंत्रपूजा, वशीकरण, मृतसंजीवनी, शक्तिपात यांसारख्या तांत्रिक क्रियांमध्ये बहुलिंगांची स्थापना केली जात असे, असे आगमिक परंपरेत सूचित होते. त्यामुळे बोरगावचे हे लिंग केवळ कलाकृती नसून एका व्यापक तांत्रिक सांस्कृतिक प्रवाहाचे मूर्त रूप असावे, अशी संशोधकांची धारणा होऊ शकते. या लिंगरचनेत नागमंडलाचा भासही लक्षवेधी आहे. नागपूजा, ग्रामदेवता परंपरा आणि तांत्रिक शिवोपासना यांचा संगम येथे प्रतीकात्मकरीत्या जाणवतो. लोकपरंपरेत अशा लिंगांची पूजा ग्रामरक्षण, पर्जन्यप्रार्थना, रोगनिवारण आणि संकटनिवारणासाठी होत असल्याचे आढळते. म्हणूनच हे लिंग स्थानिक श्रद्धा आणि आगमिक तत्त्वज्ञान यांच्यातील दुवा ठरते.
एकाच दगडात कोरलेली 21 लिंगे आणि 18 उग्र मुख ही रचना केवळ शिल्पनैपुण्याचे उदाहरण नाही; ती ब्रह्मांडीय शक्तीच्या साकल्याचे तांत्रिक प्रतिरूप आहे. केंद्रस्थानी परमशिव, भोवती रुद्रतत्त्वांची आवर्तने आणि त्यांच्या संरक्षक उग्र मुखांची वलये-जणू विश्वचक्राचे मूर्त दर्शन. भारतात आजवर ज्ञात उदाहरणांमध्ये अशा प्रकारची संयुक्त रचना आढळत नसल्याने हे लिंग ‘जगातील एकमेव’ असल्याचा दावा संशोधनात्मक महत्त्व धारण करतो.
आज या अद्वितीय वारशाची गरज आहे ती शास्त्राrय अभ्यासाची, कालमान निश्चितीची, शिल्पशैली विश्लेषणाची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संरक्षणाची. कारण हे केवळ दगड नाही; ही आपल्या भूमीच्या तांत्रिक शैव परंपरेची जिवंत स्मृती आहे. बोरगावची ही पिंडी इतिहास, तत्त्वज्ञान आणि गूढ साधनेच्या परंपरेला एकाच वेळी स्पर्श करते आणि म्हणूनच ती केवळ महाराष्ट्राची नव्हे, तर संपूर्ण भारताच्या सांस्कृतिक वारशाची
अमूल्य धारा ठरते.
(लेखक पुरातत्व संशोधक आहेत.)
[email protected]
Comments are closed.