हा क्षण कोणाच्याही नशिबी येऊ नये! क्षेपणास्त्र हल्ल्याने हादरले दुबईतील घर,अभिनेता विष्णू मांचूने शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धांमुळे आखाती आणि अरब देशांमध्ये तणाव वाढत चालला आहे. अमेरिका- इस्त्रायलने शनिवारी रात्री इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर मिसाईल हल्ला केला.याचबरोबर जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही इराणने हल्ला केला असून इतर काही ठिकाणीबी क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यामुळे दुबई विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भीषण स्फोटांच्या आवाजाने संपूर्ण शहर हादरून गेले आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आणि निर्माता विष्णू मांचू यावेळी आपल्या कुटुंबासह दुबईत आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तेथील भयावह परिस्थितीची माहिती दिली आहे. विष्णूने सांगितले की, रात्रीच्या वेळी आकाशात क्षेपणास्त्रे उडताना दिसत होती आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात अनेक स्फोट झाले. या स्फोटांची तीव्रता इतकी जास्त होती की, यामुळे त्याचे घर अक्षरशः हादरले. या भीषण आवाजामुळे त्याची छोटी मुलगी आयरा प्रचंड घाबरली आहे. आपल्या मुलीला अशा परिस्थितीत पाहणे कोणत्याही वडिलांसाठी अत्यंत वेदनादायी असल्याचे त्याने म्हटले आहे.
दुबईमध्ये आज रात्री कुटुंबाला भेट दिली. आकाशात दिसणारी क्षेपणास्त्रे. मोठ्या आवाजाने आमचे घर हादरले आणि लहान आयरा घाबरली.
शांतीसाठी प्रार्थना. कोठेही लहान मूल त्यांच्या छतावरून युद्धाचा आवाज ऐकून मोठे होऊ नये.
ठेवल्याबद्दल UAE संरक्षण दलांचे आभारी आहोत… pic.twitter.com/tCbE78eoBY
— विष्णू मंचू (@iVishnuManchu) 28 फेब्रुवारी 2026
विष्णू मांचूने आपल्या पोस्टमध्ये ‘यूएई’ संरक्षण दलाचे आभार मानले आहेत, जे नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत आहेत. त्याने लिहिले की, “जगातील कोणत्याही मुलाला आपल्या घराच्या छतावर युद्धाचे आवाज ऐकत मोठे व्हावे लागू नये. हे क्षण आपल्याला आठवण करून देतात की आयुष्य किती क्षणभंगूर आहे.” विष्णूने सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि शांततेसाठी प्रार्थना करत ‘हर हर महादेव’ असा संदेश दिला आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
केवळ विष्णू मांचूच नाही, तर बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान आणि बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू देखील सध्या दुबईत अडकल्या आहेत. सोनल चौहानने सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीचे आवाहन केले आहे. दरम्यान, दुबई विमानतळावरील विमान सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली असून, हजारो प्रवासी तिथे अडकले आहेत.
Iran-Israel war – इराणचा दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला, चार कर्मचारी जखमी
Comments are closed.