महादेवपुरा मतदारसंघाप्रमाणे चंद्रपुरातील राजुरामध्येही मतचोरी, एक महिन्यात कारवाई करा अन्यथा न्यायालयात दाद मागू – अतुल लोंढे

भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने हातात हात घालून मतचोरी केल्याचे एकाएका मतदार संघातील घोटाळे काँग्रेस पक्ष उघड करत आहे. राहुल गांधी यांनी महादेवपुरा मतदारसंघातील मतचोरीचा पर्दाफाश करून भाजपा व आयोगाच्या भ्रष्ट युती पुढे आणली आहे. महादेवपुराप्रमाणे मतचोरीचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही झाला असून याप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे पण ११ महिने झाले तरी अद्याप यावर कोणतीच कारवाई होत नाही. या मतचोरी प्रकरणी पुढील एका महिन्यात कारवाई करावी अन्यथा काँग्रेस पक्ष न्यायालयात दाद मागेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.

गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मतचोरीची माहिती देताना काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे पुढे म्हणाले की, लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या ५ महिन्यांच्या कालावधीत राजुरा मतदारसंघात ५५ हजार मतदारांची वाढ करण्यात आली. राजुरा मतदारसंघात १ ऑक्टोबर २०२४ ते १५ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ११ हजार ६६७ ऑनलाईन बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. यासंदर्भात काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी रितसर तक्रार दाखल केल्यानंतर ६८५३ मते डिलिट करण्यात आली. याप्रकरणी एफआयआर ही दाखल करण्यात आला आहे. पण पुढे काहीच कारवाई केलेली नाही. ही ऑनलाईन बोगस मतदार नोंदणी करण्यात आली त्याचे IP address, email id आणि मोबाईल नंबर ची माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे पण आजपर्यंत ती देण्यात आलेली नाही. ही माहिती दिल्यास चोर कोण, हे उघड होईल म्हणून पोलीस व प्रशासन माहिती देत नाही.

अतुल लोंढे पुढे म्हणाले की, राजुरा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवाराकडे ६१ लाख रुपये व निवडणूक साहित्य सापडले. निवडणूक आयोगाच्या FST पथकाने ही कारवाई केली आहे, गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. पण आजपर्यंत यावरही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. मतचोरी प्रकरणी काँग्रेस उमेदवार सुभाष धोटे यांनी निवडणूक आयोग, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्याकडे वारंवार निवेदन देऊनही कारवाई संदर्भात काहीच हालचाल केली जात नाही. मतचोरी प्रकरणी काँग्रेस जनतेच्या न्यायालयात लढा देत आहेच पण न्यायालयातही लढा देऊ, असे अतुल लोंढे म्हणाले.

Comments are closed.