दोन राज्यांमध्ये आज मतदान होत आहे.

पश्चिम बंगाल प्रथम टप्पा, तामिळनाडूमध्ये सज्जता

वृत्तसंस्था / कोलकाता, चेन्नई

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये आज गुरुवारी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होत आहे. पश्चिम बंगालमध्ये 294 मतदारसंघांपैकी 152 मतदारसंघांमध्ये आज गुरुवारी मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. तर तामिळनाडू या राज्याच्या सर्व 234 मतदारसंघांमध्ये मतदान केले जाईल. पश्चिम बंगाल या राज्यात मतदानाच्या द्वितीय टप्प्यामध्ये ऊर्वरित 142 मतदारसंघांमध्ये 29 एप्रिल या दिवशी मतदान होणार आहे. आसाम आणि केरळ ही राज्ये, तसेच पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश येथे 9 एप्रिललाच मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही सर्व चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश येथे 4 मे या दिवशी मतगणना होणार आहे.

आज गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी सर्व सज्जता करण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, व्हीव्हीपॅट यंत्रे आणि मतदानासाठी आवश्यक असणारी सर्व सामग्री पाठविण्यात आली आहे. मतदान केंद्रांसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारीही त्यांना दिलेल्या मतदान केंद्रांमध्ये पोहचलेले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाची सूक्ष्म दृष्टी या मतदानप्रक्रियेवर राहणार आहे.

यंत्रणा सज्ज

मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक सर्व यंत्रणा प्रत्येक मतदान केंद्रावर सज्ज करण्यात आली आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून स्थानिक पोलिसांप्रमाणेच केंद्रीय सुरक्षा दलांच्या तुकड्याही मोठ्या प्रमाणात नियुक्त करण्यात आल्या आहेत. प्रत्येक मतदाराला मतदान शांततेत, स्वतंत्रपणे आणि निर्भयपणे करता यावे, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने विशेष दक्षता घेतलेली आहे.

पश्चिम बंगालसाठी विशेष व्यवस्था

पश्चिम बंगाल हे राज्य निवडणूक हिंसाचारासाठी कुख्यात आहे. येथे निवडणूक प्रचार काळात, मतदानादिवशी आणि मतगणना झाल्यानंतरही व्यापक प्रमाणात हिंसाचार घडतो, असा अनुभव आहे. यावेळी तसे होऊ नये, यासाठी निवडणूक आयोगाने शक्य ती सर्व दक्षता घेतली आहे. प्रथम टप्प्याच्या मतदानासाठी केंद्रीय सुरक्षा दलांच्या 2 हजार 500 हून अधिक कंपन्या (2 लाख 50 हजारांहून अधिक सुरक्षा सैनिक) नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच प्रत्येक मतदानकेंद्रातही यावेळी केंद्रीय सुरक्षा दलांचे सैनिक नियुक्त केले जातील आणि स्थानिक पोलिसांना बाहेर ठेवले जाईल. कोणत्याही मतदाराला मतदान करण्यापासून वंचित ठेवले जाऊ नये, यासाठी विशेष योजना करण्यात आली आहे. तसेच गृहनिर्माण संस्थांमध्ये राहणाऱ्या मतदारांना कोणत्याही दबावात न येता मतदान करता यावे, यासाठी या संस्थांच्या परिसरातच छोटी मतदानकेंद्रे स्थापन केली गेली आहेत. बाईक मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, डबलसीट दुचाकी चालविण्यावरही बंदी घातली गेली आहे. केवळ पत्नीला घेऊन जाण्याची अनुमती आहे. बनावट मतदान रोखण्यासाठीही विशेष उपाय करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदाराची मतदान केंद्राबाहेर आणि मतदान केंद्रात अशी दोन वेळा ओळख पटविण्यात येणार आहे. गेल्या निवडणुकीत ज्यांनी हिंसाचार केला होता, अशांची सूची बनविण्यात आली असून त्यांना मतदानाच्या दिवशी स्थानबद्ध करण्यात येत आहे. मागच्या वेळचा हिंसाचार लक्षात घेऊन ही उपाययोजना केली गेली आहे. प्रथम टप्प्यातील 5 हजारांहून अधिक मतदान केंद्रे अतिसंवेनशील असल्याची घोषणा करण्यात आली असून त्या केंद्रांवर विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

तामिळनाडूतही व्यवस्था

तामिळनाडूत नेहमी निवडणूक मोठ्या प्रमाणात शांततेने पार पडते. त्यामुळे येथे एकाच दिवशी संपूर्ण मतदान प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. येथेही केंद्रीय सुरक्षा दलांच्या अनेक कंपन्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. उष्म्याचा त्रास मतदारांना होऊ नये म्हणून पेयजललाची व्यवस्था आहे. काही मतदान केंद्रे केवळ महिलांसाठी म्हणून स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली.

कोठे किती मतदार

पश्चिम बंगाल (152 मतदारसंघ)

एकंदर मतदार- 3 कोटी 60 लाख 77 हजार 310

तामिळनाडू (234 मतदारसंघ)

एकंदर मतदार- 5 कोटी 67 लाख 7 हजार 345

Comments are closed.