वाडा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी बेकायदा बांधकामांची माहिती लपवली, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल; वसुलीचा अहवाल मागवला; एका नगरसेवकाचाही अनधिकृत इमला, तत्काळ कारवाई करा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पालघर जिल्ह्यातील वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व एका नगरसेवकाच्या बेकायदा बांधकामांविरोधात सामाजिक कार्यकर्त्याने राज्य निवडणूक आयोग व पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. या तीनही लोकप्रतिनिधींनी अनधिकृत बंगले आणि गाळ्यांची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवल्याचा आरोप केला आहे. याची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली असून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून अपात्रतेची कारवाई करण्याची मागणीदेखील सामाजिक कार्यकर्ते अजय जामसंडेकर यांनी केली आहे.

नगराध्यक्ष रीमा गंधे यांच्या कुटुंबीयांनी वाडा नगरपंचायतीच्या हद्दीत अनधिकृतपणे बांधकाम करीत बंगला बांधला आहे. तर उपनगराध्यक्ष मनीष देहरकर यांच्या वडिलांच्या नावे तसेच स्वतःच्या नावावर नगरपंचायतीचे गाळे भाडेतत्त्वावर आहेत. ही माहिती त्यांनी लपवली आहे तर भाजपचे गटनेते नगरसेवक रामचंद्र भोईर यांच्या राहत्या घराचे बांधकाम नगरपंचायत दफ्तरी त्यांच्या वडिलांच्या नावे नोंद असलेल्या क्षेत्रफळापेक्षा अधिक असून ते बांधकाम अनधिकृत असल्याने या पदाधिकाऱ्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जामसंडेकर यांनी राज्य निवडणूक आयोग व पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या तक्रारीची दाखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यांना दिले आहेत.

मुख्याधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप
नगराध्यक्ष रीमा गंधे यांचे पती हर्षद गंधे हे निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३मधून नगरसेवक पदाकरिता भाजपचे उमेदवार होते. ते नगरपंचायतीचे अधिकृत ठेकेदार असताना सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी गंधे यांना ठेकेदार नसल्याचा दाखला दिला. ऐन निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाही पष्टे यांनी गंधे यांना ठेक्यापोटी सुमारे ८४ लाख रुपयांचे बिल अदा केले असताना ठेकेदार नसल्याचा दाखला दिलाच कसा, असा सवाल करीत मुख्याधिकारी पष्टे यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी जामसंडेकर यांनी केली आहे.

Comments are closed.