वाड्यातील सहा गावांत चार दिवस ब्लॅक आऊट, महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका; गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वाड्यातील हजारो नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील डाकिवली, घोनसाईसह सहा गावांमध्ये तब्बल चार दिवसांपासून ब्लॅक आऊट आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या येथील गावकऱ्यांनी उद्यापर्यंत विजेचा प्रश्न निकाली न निघाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वाडा तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील वीज पुरवठ्याचा बोजवारा उडाला असून महावितरणच्या ढिसाळ आणि मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तालुक्यातील डाकिवली, घोनसाई, चांबळे, मेट, घोडविंदे पाडा आणि लोहापे या सहा गावांमध्ये गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. वारंवार तक्रार करूनही महावितरणकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आता थेट तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
भरपावसात पिण्याच्या पाण्याची बोंब
वीज नसल्यामुळे भरपावसात पिण्याच्या पाण्याची प्रश्न गंभीर बनला असून मोबाईल चार्जिंगअभावी दळणवळण आणि संपर्क यंत्रणादेखील कोलमडली आहे. त्यातच रात्रीच्या वेळी अंधारामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढण्याची आणि हिंस्र श्वापदांची भीती निर्माण झाली आहे. मुले, वृद्ध आणि आजारी रुग्णांचेही प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
Comments are closed.