वाई पोलीस ठाण्यातील लाचखोर हवालदाराला अटक, प्रोत्साहन देणाऱ्या उपनिरीक्षकावरही गुन्हा दाखल

सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यातील हवालदाराला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले. लाच घेण्यास प्रोत्साहन दिले म्हणून पोलीस उपनिरीक्षकावरही गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांनी दिली.
पोलीस उपनिरीक्षक बिपिन बाळकृष्ण चव्हाण आणि हवालदार उमेश दत्तात्रय गहीण (सध्या रा. पोलीस वसाहत, वाई) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यापैकी हवालदार गहीण यास अटक करण्यात आली. त्यास न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदारांनी त्यांच्याविरुद्ध वाई पोलीस ठाणे येथे महिलेच्या तक्रारीवरून सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल न करण्याकरिता होत असलेल्या लाचेच्या मागणीबाबत सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस ठाण्याच्या आवारात केलेल्या पडताळणीत हवालदार गहीण यांनी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्याकरिता तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष 20 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोडी अंती 15 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करून ती प्रशासकीय इमारतीमधील पोलीस ठाणेचे बीट अंमलदार कक्षात स्वीकारली. यावेळी उपनिरीक्षक चव्हाण यांनी तक्रारदारांना शिवीगाळ व दमदाटी करून अटक करण्याची भीती दाखवली. त्यावर तक्रारदार यांनी लाच मागणीस होकार दर्शविताच त्यास सांगेल तेव्हा साक्षीदार व्हायचं, असे सांगून हवालदार याच्या लाच मागणीस प्रोत्साहन दिले.
पुणे परीक्षेत्र पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे, हवालदार नितीन गोगावले, गणेश ताटे, नीलेश राजपुरे यांनी ही कारवाई केली.
Comments are closed.