मुख्यमंत्री फडणवीस होश मे आओ; शेतकरी हक्क मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होश मे आओ, उपमुख्यमंत्री पवार-शिंदे होश मे आओ म्हणत बीड जिल्ह्यातल्या शेतकर्‍यांच्या पोरांनी आज गुरूवारी शेतीमालाच्या भावासाठी रस्त्यावर उतरून आक्रोश केला. कापसाला किमान १२ हजार रूपये तर सोयाबीन ७ हजार रूपये, तुरीला १२ हजार रूपये भाव द्यावा म्हणत छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चातून कूच केली. शेतकर्‍यांनी विविध मागण्यांचे फलक हाताने फडकावत जिल्ह्यातील शेतकर्‍यांची दयनीय अवस्था त्या फलकातून दाखवण्याचा प्रयत्न शेतकरी आंदोलनकर्त्यांकडून झाला. अतिवृष्टीने शेतातील पिके उद्धवस्त झाली. जी हाताशी आली त्याला भाव नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकरी पुत्रांनी शेतकरी हक्काचं अस्त्र उगारत हा मोर्चा काढला. या मोर्चासाठी जिल्हाभरातील विविध पक्ष, संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व शेतकर्‍यांनी सहभाग नोंदवत आपला आक्रोश आज बीडच्या रस्त्यावर नोंदवला.

यावर्षी मराठवाड्यासह राज्यभरातील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. जवळपास ७० लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती पिकाची माती झाली. शेती पिकांचे नुकसान होवून यंदा कापूस, सोयाबीन, तूर या पिकांना योग्य भाव मिळत नाही. शासनाचा हमीभावही कमीच आहे. शेती पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या वाढू लागल्या. शेतकर्‍यांच्या मालाला भाव मिळावा या मागणीसाठी जिल्हाभरातील शेतकरी पुत्रांनी एकत्रित येत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी हक्क मोर्चा काढला. कापसाला हमीभाव १२ हजार तर सोयाबीनला ७ हजार रूपये दर निश्चित करावा त्याचबरोबर शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येणार्‍या विविध योजना, सबसिडी, ठिबक, तुषार सिंचन अनुदान व पिकविमा यांची थकीत रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्यात यावी, कॉटन कॉपर्रेशन ऑफ इंडिया (सीसीआय) कडून होणारी अडवणूक थांबवून सर्व शेतकर्‍याचा कापूस खरेदी करण्यात यावा. हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणार्‍या बाजार समित्या व व्यापार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Comments are closed.