गुरुवारी लोकसभेच्या आधी डब्ल्यूएकएफ 'जेपीसी अहवाल
जगदंबिका पाल सभागृहात अहवाल मांडणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वक्फ (सुधारणा) विधेयक, 2024 वरील जेपीसी अहवाल गुरुवार, 13 फेब्रुवारी रोजी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभेत मांडला जाणार आहे. सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिले सत्र गुरुवारपर्यंतच चालणार आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी हा अहवाल मांडला जाणार आहे. त्यानंतर 10 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत चालणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात या वक्फसंबंधी अहवालावर विस्तृत चर्चा व मतदान होऊ शकेल.
संसदीय कामकाजाच्या यापूर्वीच्या अजेंड्यानुसार गेल्या आठवड्यातच भारतीय जनता पक्षाचे खासदार जगदंबिका पाल हे संजय जयस्वाल यांच्यासोबत लोकसभेत अहवाल सादर करणार होते, परंतु हे सादरीकरण पुढे ढकलण्यात आले होते. आता सभापती ओम बिर्ला यांनी हा विषय अजेंड्यावर ठेवण्याची सूचना केल्यानुसार येत्या गुरुवारी वक्फसंबंधी अहवाल सभागृहात मांडणार असे जगदंबिका पाल यांनी सांगितले.
जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) अहवालावर विरोधी पक्षाच्या खासदारांनी असहमती व्यक्त केली आहे. विधेयकावरील समितीचा अंतिम अहवाल सादर करण्यासाठी जगदंबिका पाल यांनी यापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत अहवाल सादर केला होता. आता हा अहवाल लवकरच संसद सभागृहांमध्येही सादर केला जाणार आहे. दोन्ही सभागृहांच्या मंजुरीनंतर यासंबंधीच्या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
Comments are closed.