वॉलमार्ट सीईओंचे मानधन ऐकून थक्क व्हाल! दर ३० मिनिटाला कमावतात १.४ लाख रुपये
दोन व्यक्ती भेटल्यावर अनेकदा चर्चा होते ती पगाराची. सध्या चर्चा सुरू आहे ती ‘वॉलमार्ट’च्या सीईओंची. जगातील सर्वात मोठी किरकोळ विक्री साखळी असलेल्या ‘वॉलमार्ट’चे (Walmart) सीईओ डग मॅकमिलन हे या महिन्याच्या शेवटी निवृत्त होत आहेत. मात्र, त्यांच्या निवृत्तीपेक्षा सध्या चर्चा रंगली आहे ती त्यांच्या भल्यामोठ्या पगाराची. मॅकमिलन हे दर ३० मिनिटाला साधारणपणे १.४ लाख रुपये कमावतात.
‘फॉर्च्युन’ने दिलेल्या वृत्तानुसार, मॅकमिलन यांचे वार्षिक मानधन सुमारे २७.५ दशलक्ष डॉलर्स (साधारण २४८ कोटी रुपये) इतके आहे. यामध्ये पुढील घटकांचा समावेश आहे, मूळ पगार: १३.५ कोटी रुपये, स्टॉक अवॉर्ड्स (शेअर्स): १८४ कोटी रुपये, बोनस: ४० कोटी रुपये.
गोदाम कामगार ते सीईओ एक प्रेरणादायी प्रवास
मॅकमिलन यांनी १९८४ मध्ये वॉलमार्टमध्ये एका साध्या गोदाम कामगारापासून (Warehouse Worker) सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांना तासाला केवळ ६.५० डॉलर्स (५८५ रुपये) मिळत होते. आज सीईओ म्हणून ते दर तासाला सुमारे २.८ लाख रुपये आणि दर मिनिटाला ४,७०० रुपये कमावतात. त्यांच्या सुरुवातीच्या पगारापेक्षा ही वाढ तब्बल ४८१ पटीने जास्त आहे.
अमेरिकेतील एका सरासरी कामगाराचे वार्षिक उत्पन्न ५६ लाख रुपये असते. इतकी रक्कम मॅकमिलन अवघ्या २० तासांत कमावतात. तसेच, अमेरिकेत घर घेण्यासाठी सामान्यांना अनेक वर्षे लागतात, पण मॅकमिलन यांच्या ६ दिवसांच्या पगारात ४ कोटी रुपयांचे घर सहज येऊ शकते.
इतर बड्या सीईओंची कमाई
केवळ मॅकमिलनच नव्हे, तर जगातील इतर दिग्गज कंपन्यांच्या प्रमुखांचा पगारही अवाढव्य आहे. टिम कूक (Apple) २०२४ मध्ये त्यांनी ६,७१४ कोटी रुपये कमावले. अमेरिकेच्या सरासरी कामगाराचे वर्षभराचे उत्पन्न ते केवळ ७ तासांत कमावतात. तर रिक स्मिथ (Axon) २०२४ मध्ये त्यांची कमाई सुमारे १४,८०५ कोटी रुपये इतकी होती. तसेच एलन मस्क (Tesla) मस्क यांचे मानधन पॅकेज तर १ ट्रिलियन डॉलर्सच्या घरात पोहोचले आहे.
Comments are closed.