तुझं नाव आल्याशिवाय कोणत्याही प्रकरणात तुझी चौकशी कशी होईल? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर दादा भडकले
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. त्यावरून अजित पवार यांना माध्यमांना सामोरे जावे लागत आहे. आज मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर ते भलतेच भडकले आणि पत्रकारांनाच प्रतिप्रश्न करत अधिक बोलण्यास नकार दिला.
पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न केला. आतापर्यंत मंत्र्यांवर आरोप झाले तेव्हा राजीनामा देऊन ते चौकशीला सामोरे गेले असा इतिहास आहे, तुम्ही मात्र मुंडेंना पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे, असे पत्रकारांनी विचारले. तो प्रश्न ऐकताच अजितदादा भडकले. उत्तर देताना ते म्हणाले की, ‘कितीदा तेच तेच सांगायचं. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. तुझी चौकशी कधी होईल? तुझं नाव आल्यावर होईल ना? तुझं नाव नसेल तर बळं बळं तुझी चौकशी करतील का रे?’ असा प्रतिसवाल अजित पवार यांनी केला.
सर्वांना कायदा सारखा… कुणालाही वेगळ उपचार नाही
संतोष देशमुखप्रकरणी सीआयडी वेगळी चौकशी करत आहे, एसआयटी चौकशी करत आहे, न्यायालयीन चौकशीपण आहे. सरकारने कुणालाही वेगळं काही ट्रीट करायचं ठरवलेलं नाही. सर्वांना कायदा सारखा आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.