वॉण्टेड आरोपी कपिल देढीयाला बेड्या, आर्थिक गुन्हे शाखेने वडोदऱ्यातून उचलले

न्यू इंडिया सहकारी बँकेतील 122 कोटींच्या अपहार प्रकरणातील वॉण्टेड आरोपी कपिल देढीया याला अटक झाली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने देढीयाला वडोदरा येथे पकडले. त्याला न्यायालयात हजर केले असता 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

सिव्हिल कॉण्ट्रक्टर असलेला कपिल देढीया गेल्या तीन आठवड्यांपासून पसार होता. तो कच्छ, जयपूर अशी ठिकाणे बदलून लपत होता. अखेर वडोदरामध्ये पोलिसांनी देढीयावर झडप घातली. देढीयाच्या बँक खात्यातून 12 कोटी रुपये क्रेडिट झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे पोलीस देढीयाचा शोध घेत होते.

ही रक्कम अपहार झालेल्या रकमेतील असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे देढीया तपास पथकाच्या रडारवर आला होता. पण या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हितेश मेहता, बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन, माजी सीईओ अभिमन्यू भोन आणि वॉण्टेड आरोपी अरुणाचलमचा मुलगा मनोहर यांना पोलिसांनी अटक केली होती. आता देढीया याला अटक करण्यात आली, मात्र अरुणाचलम अद्याप पोलिसांच्या हाती लागू शकलेला नाही. पोलीस त्याचा कसून शोध घेत असून तो पोलिसांना गुंगारा देत लपून राहत आहे.

Comments are closed.