‘वॉन्टेड’ ओंकार हत्ती सिंधुदुर्गच्या जंगलात,टस्कराला पकडण्यासाठी कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र राज्यांची संयुक्त मोहीम
कर्नाटकातील दांडेली अभयारण्यातून सुमारे 22 वर्षांपूर्वी सिंधुदुर्गात आलेल्या हत्तींच्या कळपातील ‘ओंकार’ नावाचा 10 ते 12 वर्षांचा टस्कर हत्ती सध्या महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे. कळपापासून वेगळा झालेला हा उपद्रवी हत्ती सिंधुदुर्गात एका वृद्धाला चिरडून मारल्यानंतर आणि गोव्यात शेतीचे मोठे नुकसान केल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात परतला आहे. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी आता तिन्ही राज्यांनी एकत्र येऊन संयुक्त मोहीम आखली आहे.
‘ओंकार’ हत्तीचे वय 10 ते 12 वर्षे असल्याने त्याचा जन्म दोडामार्ग तालुक्यातच झाला असावा, असा वन विभागाचा अंदाज आहे. या हत्तीने दोडामार्ग येथील 70 वर्षीय वृद्धाला चिरडले होते, ज्यामुळे प्रशासनाने त्याला पकडण्याचा निर्णय घेतला. मात्र अतिवृष्टीमुळे मोहीम थांबवावी लागली. 13 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरपर्यंत 14 दिवस ओंकार गोवा राज्यात होता. या काळात त्याने उत्तर गोव्यातील मोपा, कडशी मोपा, तोरसे आणि तांबोसे या भागांतील भातशेती आणि नारळाच्या झाडांचे मोठे नुकसान केले.
28 सप्टेंबर रोजी तो पुन्हा सावंतवाडी तालुक्यातील कास, सातोसे परिसरात दाखल झाला आहे. ‘गोखले संस्थे’च्या अहवालानुसार वन्य प्राण्यांमुळे दरवर्षी 10 ते 40 हजार कोटी रुपयांचे पीक नुकसान होते, ‘ओंकार’ हे त्याचे ताजे उदाहरण आहे. या पार्श्वभूमीवर ओंकारला पकडण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे.
31 डिसेंबरची मुदत ः महाराष्ट्र सरकारने ओंकारला पकडण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत निश्चित केली आहे.
मोहिमेसाठी पथक ः वनकर्मचारी, पशुवैद्यक आणि पोलीस दलातील कर्मचाऱयांचे एक पथक तयार करण्यात आले असून, हत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी 50 स्थानिक तरुणांची नेमणूक करण्यात आली आहे.
कुमकी हत्तींची मदत ः या मोहिमेसाठी कर्नाटकमधील ‘कुमकी हत्तीं’सह (प्रशिक्षित हत्ती) तज्ञांना बोलावले जाणार आहे. हे तज्ञ मार्गदर्शन करून ‘ओंकार’ला शांत करतील आणि मग त्याला पकडण्याची योजना आहे.
‘ओंकार’ सध्या महाराष्ट्र आणि गोवा सीमेवरील कास-सातोसे परिसरात (तेरेखोल नदीजवळ) वावरत आहे. हा परिसर हत्तीला पकडण्यासाठी योग्य नसल्याने योग्य ठिकाणी पोहोचल्यावर त्याला पकडण्याचे प्रयत्न केले जातील - मिलीश शर्मा, उपवनसंरक्षक (सिंधुदुर्ग)
Comments are closed.