War is not a Bollywood movie, says former Indian army chief Manoj Naravane
पुणे : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेल्या तणावानंतर शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली. पण अवघ्या काही तासांमध्येच पाकिस्तानने या शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पुन्हा एकदा घात केला. पण, पाकिस्तानने केलेल्या प्रत्येक हल्ल्याचा भारतीय सैन्याने प्रतिकार केला. पण, भारताने पाकिस्तानसोबत केलेल्या शस्त्रसंधीनंतर ती करण्याची गरज नव्हती, अशी मते देशभरातून आली. काहींनी भारताच्या या निर्णयाला सहमती दर्शवली तर काहींनी विरोध करत पाकिस्तानसोबत युद्ध करण्याचा सल्ला दिला. या सर्व प्रश्नांवर देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी आपले परखड मत मांडले आहे. (War is not a Bollywood movie, says former Indian army chief Manoj Naravane)
हेही वाचा : India Pakistan ceasefire : शशी थरूर म्हणतात, अमेरिकेची मध्यस्थी नव्हे तर…
पुण्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मनोज नरवणे म्हणाले की, “काही लोक विचारत आहेत की, आपण पूर्ण युद्ध का केले नाही? आदेश मिळाला तर मीदेखील युद्धात जाईन, पण युद्ध माझी पहिली पसंती नसेल. माझी पहिली पसंती मुत्सद्देगिरीला आहे. युद्ध ही काही रोमँटिक गोष्ट नाही. ना ती एखाद्या बॉलीवूडच्या सिनेमासारखी आहे. युद्धामुळे मृत्यू, निर्वासित समस्या, कुटुंबांचे विस्थापन असे अदृश्य, पण खोल सामाजिक नुकसान होते. युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवे.” असे म्हणत आपले परखड मत व्यक्त केले आहे.
पुण्यातील आयसीएमएच्या कार्यक्रमात माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे म्हणाले की, “ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले, त्यांच्यासाठी ते कायमचे दुःख ठरते. ज्यांनी भयानक दृश्ये पाहिली, आहेत त्यांना 20 वर्षांनंतरही घाम फुटतो आणि मानसोपचारतज्ज्ञाची आवश्यकता भासते. युद्ध हे रोमँटिक बॉलिवूड सिनेमासारखे नाही. तो एक गंभीर मुद्दा आहे. युद्ध किंवा हिंसाचार हा शेवटचा उपाय ठेवला पाहिजे. आपले पंतप्रधान म्हणाले होते की, हे युद्धाचे युग नाही. मूर्ख लोक आपल्यावर युद्ध लादण्याचा प्रयत्न करतील, पण आपण त्याचे स्वागत करू नये.” असे म्हणत त्यांनी महत्त्वाचा संदेश दिला. संवादाद्वारे मतभेद सोडवणे आणि सशस्त्र संघर्षाच्या टप्प्यावर न पोहोचणे, ही आपली प्राथमिकता असायला हवी. राष्ट्रीय सुरक्षेत आपण सर्व समान भागीदार आहोत. आपण केवळ देशांमधीलच नव्हे तर आपल्यातील मतभेदही सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, मग ते कुटुंबांमध्ये असोत किंवा राज्ये, प्रदेश आणि समुदायांमध्ये असोत. हिंसाचार हा उपाय नाही,” असे ते याव्लेई म्हणाले.
Comments are closed.