राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरील शब्दांचे युद्ध
सिंदूर अभियानावर वादग्रस्त टिप्पणी, राहुल गांधी हे ‘निशाने पाकिस्तान’: भाजपचा पलटवार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर पुन्हा वादग्रस्त टिप्पणी केली आहे. तसेच त्यांनी केंद्र सरकार आणि भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षानेही त्यांच्यावर ते निशान-ए-पाकिस्तान असल्याची खोचक टिप्पणी केली आहे. सिंदूर अभियानाची महिती जयशंकर यांनी पाकिस्तानला आधी दिली होती, असा आरोप त्यांनी पुन्हा केला. पाकिस्तानला आधी माहिती दिल्याने त्या देशाने भारताची किती युद्ध विमाने पाडली, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. तसेच, भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी घडवून आणली आहे काय, असेही विधान त्यांनी शुक्रवारी केले होते.
गौरव भाटिया यांचे प्रत्युत्तर
सध्याच्या परिस्थितीत सिंदूर अभियान अद्यात होत असताना, राहुल गांधी पाकिस्तानचे मनोधैर्य वाढविणारी विधाने करीत आहेत. ते भारताचे विरोधी पक्ष नेते नसून निशान-ए-पाकिस्तान असल्याप्रमाणे वागत आहेत. त्यांच्या विधानांना पाकिस्तानमध्ये मोठी प्रसिद्धी दिली जात आहे. आपण नेमके कोणाच्या बाजूने आहोत, हे एकदा त्यांनी स्पष्ट करावे. भारताची 140 कोटी जनता आज भारताच्या सैन्यदलांचे मनोधैर्य वाढवित असताना आणि त्यांचे समर्थन करत असताना, राहुल गांधी मात्र त्यांना हतोत्साहित करण्यात धन्यता मानत आहेत. हा केवळ भारतीय सैन्यदलांचा नव्हे, तर भारताच्या जनतेचा अवमान आहे, अशी कठोर टीका भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केली आहे.
परराष्ट्र विभागाचे स्पष्टीकरण
सिंदूर अभियानाची माहिती जयशंकर यांनी पाकिस्तानला आधी दिली, या राहुल गांधी यांच्या आरोपाला भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने यापूर्वीच प्रत्युत्तर दिले आहे. सिंदूर अभियानाचा प्रारंभ झाल्यानंतर आणि पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानंतर काही वेळात जयशंकर यांनी आम्ही दहशतवादी तळांवर हल्ले करत असल्याची आणि पाकिस्तानी सैन्याने दूर रहावे, असे आवाहन करणारी माहिती दिली होती. ती नियमाप्रमाणे देण्यात आली होती. मात्र, ही माहिती दहशतवादी तळांवर हल्ले करण्याच्या आधी देण्यात आली नव्हती, असे स्पष्टीकरण विभागाने यापूर्वी दोन वेळा दिले आहे. तरीही राहुल गांधी यांच्या जयशंकर यांनी विश्वासघात केल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे.
Comments are closed.