जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांना धक्का, तब्बल 31600 कोटींचं नुकसान

वॉरेन बफे नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांची कंपनी बर्कशायर हॅथवेला Kraft Heinz मधील गुंतवणुकीवर 3.8 अब्ज डॉलर्स म्हणजेच 31600 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. हा बर्कशायर हॅथवेला मोठा धक्का मानला जात आहे. साधारणपणे वॉरेन बफेट ज्या कंपनीत गुंतवणूक करतात ती फायद्यात राहते. मात्र, क्राफ्ट हाइन्झ मधील गुंतवणुकीमुळं त्यांना नुकसान झालंय.

कंपनीचा नफा घटला

2025 च्या दुसऱ्या तिमाहीत बर्कशायर हॅथवे च्या नफ्यात घसरण झाली आहे. यामुळं कंपनीचा निव्वळ नफा 59 टक्क्यांनी घसरून 12.37 बिलियन डॉलर म्हणजेच 10.79 लाख कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी कंपनीचा नफा 30.25 बिलियन डॉलर्स म्हणजेच 26.38 लाख कोटी रुपये नफा होता.

क्राफ्ट हाइन्ज मधील गुंतवणुकीवर वॉरेन बफेट यांना त्यांच्या भागीदारीवर नुकसान सहन करावं लागलं असलं तरी ते अजूनही फायद्यात आहे. कारण, 2015 मध्ये क्राफ्ट आणि हाइन्ज यांचं विलिनीकरण झाल्यानंतर पॅकेज्ड फूड बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरमधये 62 टक्के घसरण झाली असली तर एस अँड पी 500 निर्देशांकात याच्यामध्ये  202 टक्क्यांची तेजी आली आहे.

कंपनी करतेय अडचणींचा सामना

क्राफ्ट हाइन्जनं आता त्यांच्या व्यवसायाच्या एका भागाला  वेगळं करण्याबाबत विचार केला आहे. कारण कंपनी गेल्या काही दिवसांपासून आव्हानांचा सामना करत आहे. वाढलेल्या महागाईचा देखील परिणाम झाला आहे.  या शिवाय लोक आरोग्याबाबत सतर्क झाल्यानं ते आरोग्यदायी पर्याय शोधत आहेत. क्राफ्ट हाइन्ज शिवाय इतर कंपन्यांच्या उत्पादनांचा ते विचार करत आहेत. यामुळं क्राफ्ट हाइन्जच्या विक्रीत घसरण झाली आहे. यामुळं कंपनी तोट्यात आहे.

क्राफ्ट हाइन्जमध्ये बर्कशायर हॅथवेची 27 टक्के भागीदारी आहे. जूनच्या तिमाहीच्या शेवटी बर्कशायर हॅथवेनं क्राफ्ट हाइन्जमधील त्यांची भागीदारी 8.4 अब्ज डॉलर्सवर आणली आहे. गेल्या दोन वर्षात क्राफ्ट हाइन्जमध्ये बर्कशायर हॅथवेची गुंतवणूक कमी होत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला क्राफ्ट हाइन्जच्या बोर्डावरुन बर्कशायर हॅथवेच्या  प्रतिनिधींनी राजीनामा दिला होता.

आणखी वाचा

Comments are closed.