'आयएनएस समर्थक' ही युद्धनौका नौदल सेवेत दाखल
विविध मोहिमांमध्ये अधिक प्रभावीपणे कर्तव्य पार पाडण्याची क्षमता प्राप्त
टी. भा. प्रतिनिधी/ कारवार
कारवार बंदरातील सीबर्ड नाविकदल प्रदेशात शुक्रवारी पार पडलेल्या शानदार सोहळ्यात पहिली भारतीय बनावटीची ‘आयएनएस समर्थक’ बहुउद्देशीय युद्धनौका भारतीय नौदलाच्या सेवेत समाविष्ट करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन होते. ‘आयएनएस समर्थक’सारख्या युद्धनौकांमुळे भारतीय नौदलाला विविध प्रकारच्या कार्यात्मक मोहिमा तसेच चाचणी विषयक कामे अधिक प्रभावीपणे पार पाडण्याची क्षमता प्राप्त झाल्याचे गौरवोद्गार उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी काढले.
‘आयएनएस समर्थक’ युद्धनौकेचा नौदलात समावेश झाल्यामुळे सागरी सुरक्षा, प्रादेशिक स्थैर्य आणि संपूर्ण हिंदू महासागर क्षेत्रात सहकार्यपूर्ण संबंध वृद्धिंगत करण्याच्या भारताच्या बांधिलकीला अधिक बळ मिळाले आहे. बदलत्या आणि अनिश्चित सागरी परिस्थितीत विशेषत: अपारंपरिक सागरी धोक्यांमध्ये वाढ होत असताना या युद्धनौकेची बहुउपयोगिता भारतीय नौदलासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ‘आयएनएस समर्थक’ युद्धनौकेच्या जलावतरण कार्यक्रमाला कर्नाटकचे कामगार मंत्री संतोष लाड, नौदल प्रमुख अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन, फ्लॅग ऑफीसर कमांडिंग इन चीफ व्हाईस अॅडमिरल संजय वत्सायन, एल अॅण्ड टी जहाज निर्मिती विभागाचे प्रमुख निवृत्त रीयर अॅडमिरल जे. के. हरीश, ‘आयएनएस समर्थक’चे कमांडिंग ऑफीसर कमांडर सुशीलकुमार सिंग आदी उपस्थित होते.
‘आयएनएस समर्थक’ युद्धनौकेचा भारतीय नौदलात समावेश हा स्वदेशी युद्धनौका निर्मिती क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. एल अॅण्ड टी शिपयार्डमध्ये या युद्धनौकेची रचना आणि बांधणी करण्यात आली आहे. भारतीय खासगी शिपयार्डमध्ये बांधण्यात आलेल्या पहिल्या बृहत युद्धनौकेच्या स्वरुपातील या जहाजाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या युद्धनौकेची बांधणी करताना 75 टक्के स्वदेशी सामुग्रीचा वापर करण्यात आला आहे. या ऐतिहासिक घटनेतून देशातील खासगी युद्धनौका निर्मिती उद्योगाची वाढती क्षमता, अचुकता आणि परिपक्वता दिसून येते. ही युद्धनौका केवळ एक जहाज नसून ‘आत्मनिर्भर भारत’ या राष्ट्रीय संकल्पनेला पुढे नेण्यासाठी भारतीय नौदल आणि देशांतर्गत युद्धनौका निर्मिती उद्योग यांच्यामधील ही युद्धनौका वाढत्या समन्वयाचे प्रतिक आहे.
स्वदेशी बनावटीमुळे अनेक उद्योगांना चालना
‘आयएनएस समर्थक’ युद्धनौका हे 21 व्या शतकातील भारतीय नौदलाच्या वाढत्या तांत्रिक आणि कार्यात्मिक क्षमतांचे प्रतिक असल्याचे उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी गौरवाने नमूद केले. या युद्धनौकेमध्ये 75 टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामुग्रींचा वापर करण्यात आला आहे. युद्धनौका बांधताना मॉड्युलर बांधणी पद्धतीचा आणि पूर्वसज्जतेचा वापर केल्यामुळे बांधकाम प्रक्रिया अधिक कार्यक्षम झाली असून युद्धनौका निर्मितीसाठी लागणारा वेळही कमी करण्यास मदत झाली आहे. युद्धनौका निर्मितीच्या प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती, तांत्रिक क्षमतांचा विकास आणि भारतीय अर्थव्यवस्थेत आर्थिक योगदान यांनाही चालना मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.