कारकिर्दीत पहिल्यांदाच वर्ल्ड कप बाहेरून पाहणार! रोहित शर्माने व्यक्त केल्या भावना, कठीण निर्णयांवरही सोडलं मौन

भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) बुधवारी आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कप मैदानाच्या बाहेरून पाहणे हा त्याच्यासाठी एक वेगळा आणि ‘विचित्र अनुभव’ असेल. रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli) सध्या केवळ वनडे फॉरमॅटमध्ये खेळत आहेत. 7 फेब्रुवारीपासून मुंबईत अमेरिकेविरुद्धच्या सामन्याने भारत आपल्या विश्वविजेतेपदाच्या रक्षणासाठी मैदानात उतरेल.

या संदर्भात 38 वर्षीय रोहित म्हणाला, घरी बसून वर्ल्ड कप पाहणे किती वेगळे वाटेल, याबद्दल आम्ही चर्चा करत होतो. टी-20 वर्ल्ड कप सुरू झाल्यापासून मी प्रत्येक स्पर्धेचा भाग राहिलो आहे, त्यामुळे यंदा हे खूप वेगळे असेल. जेव्हा तुम्ही वर्ल्ड कपचा भाग नसता, तेव्हा खरी जाणीव होते. मी स्टेडियममध्ये कुठे तरी असेन, पण मैदानात नसल्यामुळे हा अनुभव पूर्वीसारखा नसेल.

रोहितने आपल्या कर्णधारपदाच्या प्रवासातील सर्वात आव्हानात्मक गोष्टींवरही प्रकाश टाकला. तो म्हणाला,वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेपूर्वी सर्वांनाच संघात स्थान देता येत नाही. तुम्ही प्रत्येकाला खुश ठेवू शकत नाही, पण खेळाडूला हे माहित असणे गरजेचे आहे की त्याला का वगळले गेले आहे. 2022 च्या आशिया चषक आणि टी-20 वर्ल्ड कपसाठी श्रेयस अय्यरऐवजी दीपक हुड्डाची निवड का केली, हे रोहितने सांगितले. तो म्हणाला की, संघाला अशा खेळाडूची गरज होती जो थोडी गोलंदाजीही करू शकेल.

रोहित आणि तत्कालीन प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्वत श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज (2025 चॅम्पियन्स ट्रॉफी) आणि युजवेंद्र चहल (2023 वनडे वर्ल्ड कप) यांच्याशी वैयक्तिकरित्या संवाद साधून त्यांना संघाबाहेर राहण्याचे कारण समजावून सांगितले होते.

रोहितच्या मते, संघात खेळाडूंशी खुलेपणाने संवाद साधणे त्याच्या नेतृत्वाचा महत्त्वाचा भाग होता. माझ्यासाठी खेळाडूंशी केवळ क्रिकेटच नाही तर आयुष्याबद्दलही बोलणे महत्त्वाचे होते. माझ्या खोलीचे दरवाजे खेळाडूंसाठी नेहमी उघडे असायचे. संघात हास्यविनोद आणि एकमेकांचा सन्मान यामुळे वातावरण नेहमी सकारात्मक राहिले, असे रोहितने सांगितले.

रोहितने सध्याच्या भारतीय संघावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. तो म्हणाला की, गेल्या टी-20 वर्ल्ड कपमधील 80 ते 90 टक्के खेळाडू आजही संघात आहेत. संघातील खेळाडूंचे सरासरी वय 25 वर्षे आहे आणि ते गेल्या दोन वर्षांपासून एकत्र खेळत आहेत, त्यामुळे त्यांच्यात चांगली ताळमेळ आहे. वर्ल्ड कपला जाताना आमचे एकच लक्ष्य आहे विजेतेपद मिळवणे, असेही त्याने ठामपणे सांगितले.

Comments are closed.