चेनबचे पाणी अवरोधित केल्यामुळे पाकिस्तानमधील पाण्याचे संकट

भारताने दोन धरणांमधून पाण्याचा विसर्ग रोखला : पाकिस्तानच्या 24 शहरांमधील 3 कोटी लोकांवर प्रभाव

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

भारताने जम्मू-काश्मीरमध्ये चिनाब नदीवर निर्मित सियाल आणि बगलिहार धरणाचे गेट बंद केले आहेत. यामुळे पाकिस्तानच्या दिशेने वाहून जाणारे पाणी थांबले असून प्रवाहातील पाणीपातळी कमी होत 15 फूटांवर आली आहे. पाकिस्तानात यामुळे पाण्याची 20 टक्क्यांपेक्षा अधिक कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. बगलिहार आणि सलाल धरणाचे गेट बंद केल्याने अखनूरमध्ये पाणीपातळीत मोठी घट दिसुन आली आहे.

पाकिस्तानात चिनाबची पातळी 22 फूटांची होती जी केवळ 24 तासांमध्ये 7 फुटांनी घटली आहे. चिनाबच्या सातत्याने कमी होणाऱ्या प्रवाहामुळे 4 दिवसांनी पंजाबच्या 24 महत्त्वपूर्ण शहरांमध्ये 3 कोटीहून अधिक लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी व्याकुळ व्हावे लागू शकते.

पाकिस्तानच्या फैसलाबाद आणि हाफिजाबाद यासारख्या घनदाट लोकसंख्या असलेल्या शहरांची 80 टक्के लोकसंख्या पेयजलासाठी चिनाबच्या प्रवाहावर निर्भर आहे. भारताच्या या पावलामुळे खरीप पिकांसाठी उपलब्ध पाण्यात 21 टक्क्यांची घट होईल अशी भीती तेथील सिंधू जल प्राधिकरणाने व्यक्त केली आहे. सिंधू नदी सल्लागार समितीने खरीपच्या प्रारंभिक हंगामाचे शिल्लक महिने आणि खरीपच्या अखेरीस जलस्थितीची समीक्षा केली आहे. मरालामध्ये भारताकडुन पाण्याचा प्रवाह रोखण्यात आल्याने चिनाब नदीतील पाणीपातळी घटली असू यामुळे प्रारंभिक खरीप हंगामात पाण्याची मोठी कमतरता निर्माण होऊ शकते अशी भीती समितीने व्यक्त केली आहे. पाकिस्तानी संसदेने भारताच्या या कृतीला युद्ध छेडण्याची कारवाई संबोधिले आहे.

2 धरणांचे गेट बंद

भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार रोखला आहे. भारताने चिनाब नदीवरील सलाल आणि बगलहार धरणाचे गेट बंद केले आहेत. केंद्र सरकार पाकिस्तानच्या विरोधात किशनगंगा धरणावरही अशाचप्रकारचे पाऊल उचलण्याचा विचार करत असल्याचे समजते.

19 सप्टेंबर 1960 रोजी भारत आणि पाकिस्तान दरम्यान 6 नद्यांच्या जलवाटपावरून सिंधू जल करार झाला होता. कराराच्या अंतर्गत भारताला तीन पूर्वेकडील नद्यांचा (रावी, व्यास आणि सतलज) अधिकार मिळाला. तर पाकिस्तानला तीन पश्चिमेकडील नद्यांच्या प्रवाहाचा (सिंधू, झेलम आणि चिनाब) वापर करण्याची अनुमती देण्यात आली होती. पाकिस्तानची 80 टक्के शेती सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांच्या पाण्यावर निर्भर आहे. आता भारताकडून या नद्यांचे पाणी रोखण्यात आल्याने पाकिस्तानात जलसंकट तीव्र होणार आहे. तेथील आर्थिक स्थिती बिघडणार आहे. याचबरोबर पाकिस्तानातील अनेक धरणांवरील जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती करत असतो, पाण्याच्या कमतरतेमुळे वीज निर्मितीत मोठी घट होऊ शकते, यामुळे आर्थिक आणि औद्योगिक घडामोडींवर प्रभाव पडणार आहे.

Comments are closed.