161 गावे, 961 वाड्यांसाठी 169 टँकरने पाणी; अहिल्यानगरमधील सव्वातीन लाख नागरिकांसाठी प्रशासन सज्ज
दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील 161 गावांमधील 961 वाड्यावस्त्यांना 169 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, 3 लाख 31 हजार 233 नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा दिलासा मिळत आहे.
पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये तसेच ग्रामीण भागातील कुटुंबांना आवश्यक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशासनाकडून टंचाईग्रस्त गावांमधील परिस्थितीचा आढावा घेऊन पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले जात आहे. उपलब्ध यंत्रणा आणि संसाधनांचा प्रभावी वापर करून गरजेनुसार टँकरद्वारे पाणी पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे. दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी शासनाने पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी एकूण 169 टँकरची व्यवस्था करण्यात आली असून, त्यामध्ये 4 शासकीय आणि 165 खासगी टँकरचा समावेश आहे. उपलब्ध टँकर यंत्रणेच्या माध्यमातून टंचाईग्रस्त गावांतील वाड्यावस्त्यांपर्यंत पाणी पोहोचविण्याचे काम सुरू आहे. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्यात आले आहे.
पाथर्डी, कर्जत, शेवगावात व्यापक उपाययोजना
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक 62 गावांतील 351 वाड्यावस्त्यांना 74 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कर्जत तालुक्यात 27 गावांतील 199 वाड्या-वस्त्यांसाठी 22 टँकर, तर शेवगाव तालुक्यात 28 गावांतील 168 वाड्या-वस्त्यांसाठी 20 टँकर कार्यरत आहेत. याचप्रमाणे अहिल्यानगर तालुक्यात 19, पारनेर 5, संगमनेर 7 टँकर, नेवासा 2 टँकर, जामखेड 8, श्रीगोंदा 4, तर पारनेरमधील 1 गावातील 31 वाड्या-वस्त्यांना 8 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
Comments are closed.