तारापूरमध्ये जलवाहिनी फुटल्याने फटका, बाराशे कारखान्यांसह 15 ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा ठप्प,

तारापूर औद्योगिक क्षेत्रासह परिसरातील ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची मुख्य जल वाहिनी गुरुवारी दुपारी अचानक फुटली. त्यामुळे सुमारे 1200 कारखान्यांसह 15 ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता असल्याची माहिती एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रातून तारापूर औद्योगिक क्षेत्राकडे 1000 मिमीच्या मुख्य जलवाहिनीद्वारे दररोज सुमारे 70 एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास बोईसर पूर्वेतील वारांगडे परिसरात विराज कंपनीजवळ ही जलवाहिनी फुटली. जमिनीखाली साधारण 10 ते 12 फूट खोल असलेल्या या पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडू लागल्याने परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
एमआयडीसी अधिकाऱ्यांची धाव
घटनेची माहिती मिळताच तारापूर येथील एमआयडीसीच्या देखभाल आणि दुरुस्ती उपविभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र यामुळे तारापूरमधील बाराशे कंपन्यांसह 15 ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये सात ते आठ तास पाणीबाणी निर्माण होणार आहे.
– दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून परिस्थिती रात्रीपर्यंत सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे एमआयडीसीतील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments are closed.