टरबुजाचे भाव २५ वरून ९ रुपयांवर; इराण-इस्त्रायल आणि अमेरिका युद्धाच्या तणावाचे पडसाद
रवींद्र घाडगे
इराण, इस्त्रायल आणि अमेरिका युद्धाच्या तणावाचे पडसाद आता थेट शेतकऱ्यांच्या शेतीमालावर उमटताना दिसत आहेत. अमेरिका इराण संघर्षामुळे निर्यात मागाँवर परिणाम झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतमाल देशांतर्गत बाजारात येत असून, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. भाज्या, फळे आणि इतर शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दर कोसळले. टरबुजाच्या भावातही मोठी घसरण होऊन १५ दिवसांत २५ रुपये किलो विकणारे टरबूज ८ ते ९ किलो प्रमाणे विक्री होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
तीन महिन्यांत शेतकऱ्यांना भरघोस नगदी उत्पन्न देणारे उन्नती साधणारे पीक म्हणजे टरबूज. शेतकरी टरबूज लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळाले. रमजान महिन्याच्या सुरुवातीला बाजारपेठेत टरबुजाचा मिळणारा २५ ते ३० रुपये प्रतिकिलोचा भाव अचानक ८ ते ९ रुपयांवर कोसळल्याने टरबूज उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. अवघ्या १५ दिवसांत बाजारपेठेतील चित्र पालटल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले आहे. कलिंगडाचा हंगाम जानेवारी महिन्यात सुरू होतो. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात कलिंगडाला मागणी तशी कमी असते. उन्हाचा चटका वाढल्यानंतर मागणीत वाढ होते. सध्या कलिंगडाचा हंगाम बहारात आला आहे. बाजारात उच्चांकी आवक होत आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्यांत कलिंगडाला सर्वाधिक मागणी असते. जून महिन्यात कलिंगडाचा हंगाम संपतो. यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता आणि रमजानमुळे कलिंगडाला मोठी मागणी होती. मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यावर्षी शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादन घेतले. सुरुवातीला २ ते अडीच लाखांच्या उत्पन्नाची आशा असल्याने शेतकरी या पिकाला जिवापाड जपत होते. मात्र, १५ दिवसांनंतर आवक वाढल्याने आणि मागणी घटल्याने भावात मोठी घसरण झाली आहे. सुरुवातीला चित्र आशादायक होते, पण अचानक भावात घसरण झाल्याने मोठे नुकसान होत आहे.
शासनाने अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. कधीकाळी शेजाऱ्यांना ‘वानोळा’ म्हणून दिले जाणारे कलिंगड आता नगदी पीक म्हणूनही तोट्यात जात असल्याने बळीराजा हतबल झाला आहे. शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होत आहे. मागणी असतानादेखील पडलेले भाव यामुळे शेतीवर विसंबून असलेल्या कुटुंबांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. कारण कलिंगड पिकासाठी एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च लागतो. तसेच सुधारित वाण आणण्यासह त्यावर महागडी खते, कीटकनाशक फवारणी आणि मजुरीचा खर्चही लागतो. सध्या मिळणाऱ्या १० ते १२ रुपये भावात लागवडीसह वाहतुकीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. यामुळे शेतातील उभे पीक तोडायचे की नाही, अशा संभ्रमात शेतकरी आहे.
वाहतुकीचा खर्च निघणेही कठीण कलिंगड लागवडसाठी शेतात मल्चिंग
पेपरसह एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च केला. आणि त्यावर खते, कीटकनाशक फवारणीदेखील वेळोवेळी केली. यावर्षी उन्हाळ्यातच रमजान महिना असल्याने चांगला भाव मिळेल, असे वाटले होते. मात्र, १५ दिवसांतच २५ रुपयांवर असणारा भाव ९ ते १० रुपयांवर आला आहे. आता शेतातील टरबूज मजूर लावून तोडायचे आणि कवडीमोल भावात विक्री करावे लागत असल्याने लागवडीसह वाहतुकीचा खर्चही निघणे कठीण झाले असल्याचे दह्याळा येथील शेतकरी उमेश बर्वे यांनी सांगितले.
Comments are closed.