इस्रोमध्ये राजीनाम्यांची लाट; सरकार सतर्क.

राजीनामा अन् व्हीआरएसचे नियम केले कठोर

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

अंतराळ विभागाने इस्रोच्या महत्त्वपूर्ण मोहिमांमध्ये सामील वैज्ञानिकांकडून दिले जाणारे राजीनामे रोखण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. एका नव्या अतंर्गत पत्रकानुसार गगनयान आणि अन्य राष्ट्रीय महत्त्वाच्या मोहिमांवर कार्यरत वैज्ञानिकांचा राजीनामा आणि स्वैच्छिक सेवानिवृत्तीशी (व्हीआरएस) निगडित नियमांना आणखी कठोर करण्यात आले आहे. अंतराळ विभागाने राजीनामा दिलेल्या वैज्ञानिकांची संख्या उघड केली नाही, परंतु मागील काही महिन्यांमध्ये कमीतकमी 100-120 वैज्ञानिक आणि कर्मचाऱ्यांनी इस्रोमधून राजीनामा दिला आहे. यूआर राव उपग्रह केंद्रामधील सुमारे 80 कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. तर विक्रम साराभाई अंतराळ केंद्रामधील कमीतकमी 20 कर्मचारी संस्थेतून बाहेर पडले आहेत. तर काही वैज्ञानिक आणि कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्यावर प्रक्रिया सुरू असल्याने ही संख्या वाढू शकते असे सूत्रांचे सांगणे आहे.

महत्त्वाच्या शास्त्रज्ञाचा राजीनामा

राजीनामा देणाऱ्यांमध्ये व्हीएसएससीचे एलव्हीएम-3 प्रकल्प संचालक व्हिक्टर जोसेफ यासारखे वरिष्ठ अधिकारीही सामील आहेत. याचबरोबर यूआरएससीचे स्पाडेक्स मिशनच्या प्रकल्प संचालकांनीही संस्थेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. चांद्रयान-3 मोहिमेशी संबंधित एक अत्यंत प्रतिभावंत युवा वैज्ञानिकानेही अलिकडेच राजीनामा दिला आहे.

इस्रो प्रमुखांचे काय म्हणणे?

अनेक वैज्ञानिक संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहेत, परंतु इस्रो या स्थितीला सामोरे जाण्यास पूर्णपणे तयार आहे. लोक येत आणि जात असतात आणि ही प्रक्रिया प्रत्येक संघटनेत घडत असते. तर नवे पाऊल केवळ कर्मचाऱ्यांना रोखण्यासाठी नव्हे तर महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर अचानक कुठलाच प्रतिकूल प्रभाव पडू नये म्हणून उचलण्यात आले आहे. संघटनेतून कुणी बाहेर पडल्यास त्याची जबाबदारी सांभाळण्यासाठी दुसरा व्यक्ती तयार राहिल. आम्ही यावर सातत्याने नजर ठेवून आहोत असे इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी सांगितले आहे.

चिंता का वाढली?

इस्रोच्या 14,600 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अलिकडच्या काळात राजीनामा देणाऱ्यांची संख्या खूप मोठी नाही, परंतु यातील बहुतांश वैज्ञानिक रणनीतिक स्वरुपात अत्यंत महत्त्वपूर्ण केंद्र आणि प्रकल्पांशी जोडले गेलेले होते यामुळे चिंता व्यक्त होतेय. मागील आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत यूआरएससीमध्ये 1,339 कर्मचारी कार्यरत होते, तर इस्रोचे सर्वात मोठे केंद्र व्हीएसएससीमध्ये 4,577 कर्मचारी होते. अशास्थितीत महत्त्वपूर्ण मोहिमांवर काम करणाऱ्या अनुभवी वैज्ञानिकांनी राजीनामा देणे चिंतेचा विषय मानला जात आहे.

नव्या आदेशात काय बदल?

नव्या निर्देशांनुसार  गगनयान आणि अन्य महत्त्वपूर्ण मोहिमांशी जोडले गेलेले वैज्ञानिकांचा राजीनामा किंवा व्हीआरएसचा अर्ज सामान्य परिस्थितीमध्ये स्वीकारण्यात येणार नाही. संबंधित प्रकल्प पूर्ण होईपर्यंत अशाप्रकारच्या अर्जांना मंजुरी न देण्याचा सल्ला अंतराळ केंद्रांच्या संचालकांना देण्यात आला आहे. आता अशाप्रकारच्या सर्व प्रकरणांना केंद्र संचालकाच्या शिफारसीसोबत अंतिम निर्णयासाठी थेट अंतराळ विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.

Comments are closed.